कोविडनंतरचे पर्यटन; मराठवाडा कृषी व ग्रामीण पर्यटन महामंडळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:02 PM2020-11-03T19:02:30+5:302020-11-03T19:04:09+5:30
औरंगाबाद- नांदेड- तुळजापूर हा मार्ग ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनाने बहरलेला असून हा मार्ग म्हणजे मराठवाड्याचा सुवर्ण त्रिकोन होऊ शकतो.
औरंगाबाद : ‘कोविड १९ मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यातील अनुभवजन्य पर्यटनाचा प्रचार करून पर्यटकांसाठी टूर्स चालू करता यावे, या अनुषंगाने पर्यटन संचालनालयातर्फे दि. २० ऑक्टोबर रोजी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये मराठवाड्याचे प्रतिनिधित्व आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक यांनी केले असून मराठवाड्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मराठवाडा कृषी व ग्रामीण पर्यटन महामंडळाची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
मुंबई येथे झालेल्या या बैठकीला पर्यटन विभागाचे सहसंचालक धनंजय सावळकर व सहायक योगेश निर्गुडे यांची विशेष उपस्थिती होती. पर्यटन वृद्धीसाठी काय करता येईल, यासाठी महाराष्ट्रातून १२ पर्यटनतज्ज्ञांना बैठकीदरम्यान सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात आले होते. यामध्ये मराठवाड्यातून गणेशवाडी कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अनिरुद्ध नाईक यांनी मराठवाड्यातील पर्यटनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. सादरीकरणात अजिंठा-गौताळा टूरिझम कॉरिडॉर हा मुद्दा नाईक यांनी मांडला. यामध्ये हेमाडपंथी मंदिरे, धबधबे, किल्ले ही माहिती ऐकून संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या मार्गाचे काम लवकरच पूर्ण करून घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच बुलडाणा येथील जाईचा देव ते पाटणादेवी या भागातील निसर्ग अतिशय समृद्ध असून या क्षेत्राचा विकास झाल्यास मराठवाड्यात आलेला पर्यटक ४ ते ५ दिवस मराठवाड्यातच मुक्काम करेल, यातूनच स्थानिकांना रोजगार मिळेल, असे मतही नाईक यांनी मांडले.
मराठवाड्याचा गोल्डन ट्रँगल
- औरंगाबाद- नांदेड- तुळजापूर हा मार्ग ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनाने बहरलेला असून हा मार्ग म्हणजे मराठवाड्याचा सुवर्ण त्रिकोन होऊ शकतो.
- अजिंठा पर्यटन प्राधिकरणाची गरज
- कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
- अजिंठा महोत्सवाची गरज
- यात्रांचे नियोजन व स्थानिक पर्यटन
- धार्मिक, कृषी व ग्रामीण पर्यटन यांचा परस्पर विकास
- सोयगाव आदिवासी भूमी पर्यटन. असे मुद्देही नाईक यांनी पर्यटनाच्या दृष्टीने मांडले.