ग्राहक मंचचा पोस्टाला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:41 AM2017-09-20T00:41:16+5:302017-09-20T00:41:16+5:30
त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरुन अर्जदाराने भरलेले २ लाख रुपये पोस्ट खात्याने परत करावेत, असा आदेश ग्राहक न्यायमंचने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरुन अर्जदाराने भरलेले २ लाख रुपये पोस्ट खात्याने परत करावेत, असा आदेश ग्राहक न्यायमंचने दिला आहे.
पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथील सुनीता धवन यांच्या पतीने पोस्ट खात्यात विमा पॉलिसी घेतली होती. त्यानंतर मोटार अपघातात त्यांचे पती कोमामध्ये गेले. त्यामुळे ते पॉलिसीचे पुढील हप्ते भरु शकले नाहीत. शेवटी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पतीने काढलेल्या विमा पॉलिसीच्या रक्कमेसाठी सुनीता धवन यांनी पोस्ट खात्याकडे अर्ज केला.
मात्र हप्ते न भरल्याने पॉलिसी लॅप्स झाल्याचे कारण देत हा अर्ज पोस्ट कार्यालयाने फेटाळून लावला. या प्रकरणी सुनीता धवन यांनी अॅड. गजानन चव्हाण यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात पोस्ट खात्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
अर्जदाराचे पती हे कोमामध्ये गेल्याने पॉलिसीचे पुढील हप्ते भरु शकले नाहीत, ही बाब पोस्ट खात्याने ग्राह्य धरुन पुढील हप्ते भरावेत, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. फार तर पोस्ट खात्याने उर्वरित हप्त्याची रक्कम कपात करुन बाकीची रक्कम अर्जदारास परत देणे आवश्यक होते. मात्र असा कोणताही विचार न करता खात्याने विमा दावा निरस्त केला. ही बाब सेवेतील त्रुटी आहे, असा निष्कर्ष काढला. त्यानंतर पोस्ट खात्याने अर्जदार सुनीता धवन यांना न भरलेले हप्ते कपात करुन २ लाख रुपये द्यावेत.
तसेच मानसिक त्रासापोटी २ हजार ५०० रुपये दंड द्यावा, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने अॅड. गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली.