‘स्पर्धेच्या जगात’ पोस्टरचे विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:35 AM2017-08-02T00:35:59+5:302017-08-02T00:35:59+5:30
‘लोकमत’ने ‘घडवा तुमचे युनिक भविष्य’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत ‘स्पर्धेच्या जगात’ ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखमालिका सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१) शिवछत्रपती महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते उपक्रमाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉक्टर व इंजिनिअर होण्याची मनीषा बाळगण्याच्या काळात तरुणाईचा स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल आनंदाची गोष्ट आहे. प्रशासकीय अधिकारी होऊन देशसेवा आणि समाजसेवा करण्यासाठी प्रेरित या तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने ‘लोकमत’ने ‘घडवा तुमचे युनिक भविष्य’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत ‘स्पर्धेच्या जगात’ ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखमालिका सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१) शिवछत्रपती महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते उपक्रमाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. पी. व्ही. अष्टेकर, अभिजित देशमुख, ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, ब्यूरो चीफ नजीर शेख आणि वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षांबाबत जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांना मार्गदर्शन करताना नागनाथ कोडे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ज्ञान व माहिती वर्तमानपत्रातून मिळते. विविध विषयांची अद्ययावत माहिती बातम्यांद्वारे कळत असते. आता ‘लोकमत’ने खास स्पर्धा परीक्षांची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेतल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.
विद्यार्थ्यांनी आवर्जून याचा लाभ घेतला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, मेहनत, जिद्द, चिकाटी या जोरावर यश मिळवले जाऊ शकते ही पक्की खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. ध्येय ठरवून सकारात्मक विचारांनी मेहनत करा, असा सल्ला त्यांनी
दिला.
प्राचार्य अष्टेकर म्हणाले, स्वत:वर विश्वास ठेवून मोठे स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र एक करा. स्पर्धा परीक्षांमध्ये भविष्य घडवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ‘लोकमत’च्या लेखमालेतून मार्गदर्शक धागा मिळेल.
सुधीर महाजन यांनी स्पर्धा परीक्षांचे वाढते लोण अधोरेखित करून सांगितले की, या लेखमालेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तांत्रिक माहिती, तयारी कशी करावी, परीक्षेचे स्वरूप आदी गोष्टींची इत्थंभूत माहिती मिळेल. सर्व क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातही मुलींनी बाजी मारावी, असे ते
म्हणाले.