मुकादमाचा जाच; मजुराची आत्महत्या
By Admin | Published: November 13, 2015 11:59 PM2015-11-13T23:59:31+5:302015-11-14T00:52:09+5:30
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण येथे मुकादमाच्या जाचाला कंटाळून एका मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आली. याप्रकरणी मुकादमाविरूध्द ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण येथे मुकादमाच्या जाचाला कंटाळून एका मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आली. याप्रकरणी मुकादमाविरूध्द ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
त्रिंबक सर्जेराव अडागळे (वय २३, रा. टाकरवण) असे मयत मजूराचे नाव आहे. राजेंद्र उर्फ जिजा विठ्ठल शिंदे (रा. तपेनिमगाव, ता. गेवराई) या मुकादमाकडून त्रिंबक अडागळे यांनी ऊसतोडणीसाठी ४० हजार रूपयांची उचल घेतली होती. अडागळे दाम्पत्य ऊसतोडणीसाठी गेवराई तालुक्यात गेले. दुसऱ्या दिवशी अडागळे यांची पत्नी वर्षा ही आई-वडिलांना भेटण्यासाठी मोठीवाडी (ता. माजलगाव) येथे गेली. त्या दिवशी त्रिंबक अडागळे यांनी ऊसतोडणीचे काम केले. सायंकाळी मुकादम शिंदे याने तू तुझ्या पत्नीला माहेरी का पाठविले ? ऊसतोडणीच्या कामात अडथळा येत आहे, असे सुनावत अपमान केला. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी त्रिंबक अडागळे पत्नीला आणण्यासाठी मोठीवाडीला गेले. मात्र, जाताना टाकरवण येथेच विषारी द्रव प्राशन केले. मोठीवाडीत गेल्यावर चक्कर येऊन पडले.
८ रोजी उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. वर्षा अडागळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून मृत्यूस कारणीभूत व अॅट्रासिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला. आरोपी फरार आहे. तपास उपअधीक्षक आर. एल. चाफेकर हे करीत आहेत. (वार्ताहर)
त्रिंबक अडागळे हे ऊसतोडी करून संसाराचा गाडा हाकत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. कर्ता पुरूष गेल्यामुळे पत्नी वर्षासह तीन मुले उघड्यावर आली आहेत.