विद्यापीठाशी संलग्नित ६१ महाविद्यालयात शिक्षकांविनाच पदव्युत्तर अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 02:18 PM2020-01-16T14:18:18+5:302020-01-16T14:51:07+5:30

येत्या शैक्षणिक वर्षात अनेक नामांकित महाविद्यालये प्रवेशाला अपात्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेत निर्णय

Postgraduate courses without any teachers in 61 colleges affiliated to the Dr. BAMU A'bad | विद्यापीठाशी संलग्नित ६१ महाविद्यालयात शिक्षकांविनाच पदव्युत्तर अभ्यासक्रम

विद्यापीठाशी संलग्नित ६१ महाविद्यालयात शिक्षकांविनाच पदव्युत्तर अभ्यासक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्ण वेतनासाठी महाविद्यालयांची पळवाटही आहेत नामांकित महाविद्यालये

- राम शिनगारे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ६१ महाविद्यालयांचे नवीन कायद्यानुसार तत्कालीन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या नेतृत्वात ‘अकॅडमिक आॅडिट’ करण्यात आले होते. या आॅडिटनुसार ६१ पैकी तब्बल ३० महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षकांविना चालविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या महाविद्यालयात आगामी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

विद्यापीठ प्रशासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३७ (ट) तरतुदीनुसार महाविद्यालयांचे अकॅडमिक आॅडिट केले.  या आॅडिटच्या अहवालानुसारच संबंधित महाविद्यालयास संलग्नता देण्याची तरतूद आहे. या तरतुदीची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या आॅडिटमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ६१ पैकी तब्बल ४२ महाविद्यालयांत व्यावसायिक, पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. यातील १२ व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांना एआयसीटीईच्या धोरणानुसार प्राध्यापकांची नेमणूक केलेली आहे. यातील बहुतांश महाविद्यालये अभियांत्रिकी, औषधनिर्माण, एमएसडब्ल्यू, शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांची आहेत. तर उर्वरित तब्बल ३० महाविद्यालयांमध्ये १२४ पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविण्यात येतात. मात्र विद्यापीठाची मान्यता घेऊन या अभ्यासक्रमांच्या अध्यापनासाठी एकाही महाविद्यालयाने प्राध्यापकांची नेमणूक केलेली नाही. 

या महाविद्यालयांना आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच याविषयीचा ठराव नुकत्याच झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विनाशिक्षक पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अनुदानित नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे.

पूर्ण वेतनासाठी महाविद्यालयांची पळवाट
अनुदानितसह विनाअनुदानित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम हे कायमविना अनुदानित तत्त्वावर चालविण्यात येतात. या अभ्यासक्रमांना नियमानुसार विद्यापीठाची मान्यता घेऊन प्राध्यापकांची नेमणूक केल्यास संबंधितांना कायद्यानुसार संपूर्ण वेतन देणे बंधनकारक ठरते. यातून पळवाट काढण्यासाठी अनेक महाविद्यालये तुटपुंज्या मानधनावर प्राध्यापकांची नेमणूक करतात, मात्र त्यास विद्यापीठाची मान्यता घेत नसल्याची माहितीही समोर आली आहे.

ही आहेत नामांकित महाविद्यालये
पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविताना शिक्षकांची नेमणूक न करणाऱ्या महाविद्यालयांची यादी पुढीलप्रमाणे-  डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वूमन्स, नवखंडा, औरंगाबाद (३ पदव्युत्तर अभ्यासक्रम), मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, खडकेश्वर, औरंगाबाद (१), श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री, जि. औरंगाबाद (१), जेईएस महाविद्यालय, जालना (५), मत्स्योदरी शिक्षणसंस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अंबड, जि. जालना (४), स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा, जि.जालना (१), सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफ्राबाद, जि.जालना (१), आदर्श महाविद्यालय, उमरगा, जि. उस्मानाबाद (५), शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि. उस्मानाबाद (५), नवगण शिक्षणसंस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा, जि.बीड (२), मिलिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, बीड (५), नवगण शिक्षणसंस्थेचे वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा, जि.बीड (४), खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई (२), योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई, जि.बीड (४), महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पांगरी रोड, बीड (२), महर्षी गुरुवर्य आर. जी. शिंदे महाविद्यालय, परांडा, जि. उस्मानाबाद (१),  श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम, ता. उमरगा, जि.उस्मानाबाद (६), विधि महाविद्यालय, उस्मानाबाद (२), संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी, जि. जालना (२), आर.पी. महाविद्यालय, उस्मानाबाद (७), देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद (२५), जी. एस. मंडळाचे मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, एन-४, सिडको औरंगाबाद (२), विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर, जि. औरंगाबाद (५), एम. पी. लॉ कॉलेज, औरंगाबाद (१), संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव, जि. औरंगाबाद (४), श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा, जि. उस्माबानाद (१०), एसआरटी महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड (५), शासकीय फार्मसी कॉलेज, औरंगाबाद (२), डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालय, औरंगाबाद (१) आणि लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय, परतूर, जि. जालना येथे सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षकांविना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाविद्यालयांना एक संधी देऊ
विद्यापीठ प्रशासनाने ६१ संलग्न महाविद्यालयांचे अकॅडमिक आॅडिट केले. त्यातील ३० महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिक्षक नसल्याचे स्पष्ट झाले. या महाविद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिले जाणार नाहीत. मात्र त्यापूर्वी पूर्णवेळ शिक्षक नेमण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच उर्वरित महाविद्यालयांचेही लवकर अकॅडमिक आॅडिट केले जाणार आहे.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

Web Title: Postgraduate courses without any teachers in 61 colleges affiliated to the Dr. BAMU A'bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.