आरक्षण प्रश्नी सोशल मीडियात पोस्ट करणे प्राध्यापकाच्या नोकरीवर बेतले
By राम शिनगारे | Updated: March 11, 2024 15:07 IST2024-03-11T15:06:49+5:302024-03-11T15:07:16+5:30
‘मशिप्र’ मंडळाची कारवाई : विभागीय चौकशीनंतर केले कार्यमुक्त

आरक्षण प्रश्नी सोशल मीडियात पोस्ट करणे प्राध्यापकाच्या नोकरीवर बेतले
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात कार्यरत एका प्राध्यापकास सोशल मीडियात पोस्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. संबंधित प्राध्यापकाने पोस्ट केल्यानंतर त्यांच्या विरोधात बीड शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यात अटक झाल्यामुळे सुरुवातीला संस्थेने निलंबित केले. त्यानंतर केलेल्या विभागीय चौकशीत दोषी आढळल्यामुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
डॉ. सुरेश एकनाथ घुमटकर असे प्राध्यापकाचे नाव आहे. ते मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक होते. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते. तेव्हा डॉ. सुरेश घुमटकर यांनी ११ सप्टेंबर २०२३ रोजी स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्यामुळे अर्जुन धांडे यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात १४ सप्टेंबर २०२३ रोजी तक्रार नोंदवली. या गुन्ह्यात डॉ. घुमटकर यांना १५ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. ते ४८ तासांपेक्षा अधिक काळ अटकेत राहिल्यामुळे ‘मशिप्र’ मंडळाने त्यांना सुरुवातीला निलंबित केले. त्यानंतर ४ जानेवारी २०२४ रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. नंतर डॉ. घुमटकर यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी ठरल्यानंतर मंडळाकडून बडतर्फीची कारवाई केली.
चुकीच्या पद्धतीने कारवाई
माझ्या फेसबुक पोस्टमध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही. माझ्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. या निर्णयाच्या विरोधात विद्यापीठ न्यायाधिकरणाकडे आव्हान देण्यात आले आहे. त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळेल.
- डॉ. सुरेश घुमटकर, बडतर्फ प्राध्यापक