पाण्याअभावी थांबले पोस्टमार्टेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:37 AM2017-10-18T00:37:51+5:302017-10-18T00:37:51+5:30
घाटी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी (दि. १७) पाण्याअभावी शवविच्छेदन प्रक्रिया थांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी (दि. १७) पाण्याअभावी शवविच्छेदन प्रक्रिया थांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सकाळपासून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याचा प्रश्न न सुटल्याने संयम सुटल्याने नातेवाईकांनीच टँकर मागविला.
घाटीत सकाळी ६ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ दोन मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनगृहातील पाणी संपल्याने दुपारपर्यंत तीन मृतदेहांचे शवविच्छेदन थांबले. सिडको बसस्थानक चौकात झालेल्या अपघातातील मयत बालाजी ढंगारे यांच्या नातेवाईकांनाही मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत वाट बघावी लागली. पाण्यामुळे शवविच्छेदन होत नसल्याची कल्पना येताच नातेवाईकांनीच टँकर मागवून घेतले. केवळ टँकर मागवून नातेवाईक थांबले नाही तर त्यांनी स्वत: टाक्यांमध्ये पाणी चढविण्यासाठी मदत केली. मयतांचे नातेवाईक आणि मित्रांनी संताप व्यक्त करताच घाटी प्रशासनानेही टँकर मागविला. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरळीत झाली.
घाटीत दररोज २ ते १४ मृतदेहांचे शवविच्छेदन होते. यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने येथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. सोमवारी दिवसभरात १४ मृतदेहांचे शवविच्छेदन झाले; परंतु दुस-या दिवशी पुरेसे पाणी आहे की नाही, याची खबरदारी घेण्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारच्या घटनेने समोर आले.