वाळूजमध्ये लिंकरोड चौफुलीवर जिवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:39 PM2018-12-08T18:39:26+5:302018-12-08T18:41:06+5:30
ए.एस.क्लबजवळील लिंकरोड चौफुलीवर खड्डे पडल्यामुळे या चौफुलीवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
वाळूज महानगर : ए.एस.क्लबजवळील लिंकरोड चौफुलीवर खड्डे पडल्यामुळे या चौफुलीवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरुन वाहनधारकांना जिव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत आहेत.
महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने ए.एस.क्लब ते पैठणरोडला जोडणाऱ्या या लिंकरोडचे काम चार-पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. या लिंकरोडमुळे नगरनाका मार्गावरील अवजडवाहनांची वर्दळ कमी होऊन अपघातांच्या संख्येतही घट झाली होती. मात्र, अल्पवधीत या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. या लिंकरोडवरील पुलाजवळ अनेक खड्डे पडले असून, हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.
संबधित ठेकेदाराकडून मुदतीत या रस्त्याची दुरुस्ती करुन न घेण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या लिंकरोड रस्त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलली जात नसल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.
खड्ड्यांमुळे ट्रक उलटला
मालवाहू वाहने खड्डयात आदळून पलटी होण्याच्या घटनाही घडत आहेत. अमरावतीहून वैजापूरकडे भुसा घेऊन जाणारा ट्रक (एम.एच.०४-जी.एच.१३२७) शनिवारी सकाळी चौफुलीवरील खड्डयात आदळून पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे व त्यांच्या सहकाºयांनी क्रेन मागवून ट्रक हटविण्यात आला.
वाहतूक शाखेच्या पत्रांना केराची टोपली
ए.एस.क्लब ते पैठणरोडला जोडणाºया या लिंकरोची दुरुस्ती करावी, यासाठी वाहतूक शाखेने सार्वजनिक बांकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प, उद्योजक संघटना, सिडको प्रशासन व एमआयडीसीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र संबधित विभागांकडून रस्ता दुरुस्तीसाठी पावले उचलाी जात नसल्याची खंत वाहतूक शाखेचे निरीक्षक पगारे यांनी केली आहे. लिंकरोड चौफुलीवरील कमान एका बाजूने झुकली असून, ती केव्हाही कोसळण्याची भिती आहे. याच्या दुरुस्तीकडेही संबधित विभाग कानाडोळा करीत आहे.
दररोज होते वाहतुकीची कोंडी
लिंकरोड चौफुलीवरील खड्डयात वाहने आदळून नादुरुस्त होतात. तसेच अवजडवाहनेही अनेकदा पलटी होत असल्याने या चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होते. या चौफुलीवर अपघात घडल्यास नगररोड व लिंकरोडवरील वाहनांच्या रांगा लागतात. किमान या चौफुलीवरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची मागणी उद्योजक, वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.