‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी
By संतोष हिरेमठ | Published: April 27, 2024 12:23 PM2024-04-27T12:23:52+5:302024-04-27T12:27:29+5:30
‘ऑन द स्पॉट’ @ प्रचार कार्यालय; कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्टा, जेवणाची विशेष काळजी
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी जोर धरत आहे. प्रचारासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे ठरतात आणि याच कार्यकर्त्यांची विविध पक्षांकडून खास सोय करण्यात आली आहे. महायुतीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांची कॉर्पोरेट पद्धतीने सोय करण्यात आली आहे; तर महाविकास आघाडीने खास दिल्लीवरून स्वयंपाकी आणला आहे.
जवळपास सर्वच प्रचार कार्यालये गजबजली आहेत.
प्रचारासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते रोज उन्हात फिरताहेत. ते धावपळीमुळे थकून जातात. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी बडदास्त सध्या सर्वच प्रचार कार्यालये अदबीने ठेवत आहेत. सकाळची सुरुवात गरमागरम चहाने होते, तर कोणासाठी कॉफीही असते. चहा-नाष्ट्याच्या वेळी प्रचाराची व्यूहरचना आखण्यात येते.
महायुती प्रचार कार्यालय
महायुतीच्या कार्यालयात चहा, पाणी देण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ एखाद्या हॉटेल, कार्यालयात, लग्नसमारंभात जशी व्यवस्था असते, वेटर असतात, तशी सोय करण्यात आली आहे. कोणतेही कार्यकर्ते, पदाधिकारी आले आणि खुर्चीवर बसले की, लगेच वेटर चहा, पाणी घेऊन येतो. बिस्कीट हवे आहे का, अशीही विचारणा केली जाते. याच ठिकाणी, वेगळ्या मंडपात कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी प्रचार कार्यालय
महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रचारासाठी ग्रामीण भागात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवणाचे डबे देण्यात येतात. प्रचार कार्यालयाजवळील जागेत कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. खास दिल्लीहून आचारी आल्याचे सांगण्यात आले. गेल्या २० वर्षांपासून हे ‘कुक’ प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरात येतात, हे विशेष.
एमआयएम प्रचार कार्यालय
‘एमआयएम’च्या प्रचार कार्यालयातही कार्यकर्त्यांच्या चहा, पाणी यांची काळजी घेतली जात आहे. प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाचीही काळजी घेतली जाते, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रचार कार्यालयाचा मंडप वाढविण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळाले.