उच्च शिक्षित शेतकऱ्याच्या नियोजनाने केऱ्हाळ्यात होतेय पोल्ट्री, शेळीपालन हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:17 PM2018-12-04T12:17:00+5:302018-12-04T12:17:08+5:30
यशकथा :संजय चुंगडे या शेतकऱ्याने उत्कृष्ट नियोजनाने पोल्ट्री व शेळीपालन व्यवसायात आर्थिक प्रगती साधली.
- कैलास पांढरे, (केऱ्हाळा, जि.औरंगाबाद)
सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील उच्चशिक्षित संजय चुंगडे या शेतकऱ्याने उत्कृष्ट नियोजनाने पोल्ट्री व शेळीपालन व्यवसायात आर्थिक प्रगती साधली. संजयने इतरांनाही याबाबत मार्गदर्शन केल्याने या गावातील सुमारे पंचवीस जणांनी याचे अनुकरण केले आहे. यामुळे हे गाव आता पोल्ट्री व शेळीपालन हब होऊ पाहत आहे. या माध्यमातून दुष्काळातही चांगली आर्थिक प्रगती गावातील तरुण शेतकरी साधत आहेत.
उच्चशिक्षित तरुण शेतकरी संजय देवसिंग चुंगडे या युवकाकडे केऱ्हाळा परिसरात तीन एकर शेती आहे. संजय यांनी गेल्या काही वर्षांपासून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. परंतु निसर्गाच्या अवकृपेने अनेक प्रयोग अयशस्वी ठरले. त्यानंतर घरची हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी संजयने शेतीलापूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला कुक्कुटपालन करण्याचे ठरविले. आर्थिक गणित जुळत नसल्याने त्यांनी शक्कल लढवून कमी खर्चात बांबू, पऱ्हाटी, उसाची पाचट, यासारख्या टाकाऊ वस्तंूपासून २५ बाय ४० चे शेड तयार केले. त्यात कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केला. बांबू, पऱ्हाटीच्या शेडमध्ये संजयला सुरुवातीच्या एका वर्षातच लाखो रुपयांचा नफा मिळाला.
या उत्पन्नाच्या जोरावर संजयने पुन्हा नवीन दोन हजार पक्ष्यांच्या क्षमतेचे ८० बाय २५ बांधकाम करून नवीन शेड तयार केले. त्यात पुन्हा पंधराशे पक्ष्यांचा व्यवसाय सुरू केला. जुन्या व नव्या या दोन्ही शेडमधून वर्षाकाठी खर्च वगळता तीन ते चार लाख रुपयांची बचत झाली. बचतीचा चांगला मार्ग मिळाल्याने संजयची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. यानंतर कुक्कुटपालनासोबतच त्याने शेळीपालन व्यवसाय सुरू केला.
संजयने आज ६ हजार कोंबड्या व २५० शेळी पालनासाठी पुरेल एवढ्या मजबूत शेडची निर्मिती केली आहे. गिरिराज, वनराज, ग्रामप्रिया, डी.पी.क्रास पाथर्डी, कडकनाथ व बॉयलर यासारख्या पक्ष्यांची कुक्कुटपालनासाठी त्याने निवड केली आहे. ही निवड सर्व अभ्यासांती केली आहे. यासाठी त्याने सर्व बाजारांचा अभ्यास केला. यात सर्वात जास्त कोणत्या कोंबडीला मागणी आहे. हे पाहून निवड केली. याच पद्धतीने त्याने शेळ्यांचीही निवड केली.
गिरिराज या जातीच्या कोंबड्यांपासून मागील वर्षी दररोज ५०० अंडी विकायचा. या माध्यमातून संजय दररोज दोन ते अडीच हजार रुपये नफा मिळवीत होता. शेळीपालनात सोजात, शिरोई व गावरान या विविध जातीचे पालन संजय या दोन्ही शेतीपूरक व्यवसायाचे गावातील वीस ते पंचवीस शेतकऱ्यांना नि:शुल्क प्रशिक्षणाचे धडे देत आहे. यामुळे गावातील बेरोजगार सुमारे २५ तरुण शेतकऱ्यांनी याचा आदर्श घेऊन या व्यवसायातून लाखो रुपये नफा कमावला आहे. गावात प्रतिमहिन्याला १८ ते २० हजार कोंबड्यांची तर चार ते पाच महिन्याला ६०० ते ७०० बोकडांची विक्रमी विक्री होत असून, हे गाव कुक्कुट व शेळीपालन हब झाले आहे.