पाऊस येताच वीजपुरवठा खंडित; महावितरण म्हणते अर्ध्या तासावर वीज ‘गुल’ तर फोन करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 02:02 PM2023-06-16T14:02:56+5:302023-06-16T14:05:29+5:30

मान्सूनपूर्व कामे, तरीही अंधारात बसण्याचीच नागरिकांवर वेळ

Power cut when it rains; Mahavitaran says if the power goes out for half an hour, then call! | पाऊस येताच वीजपुरवठा खंडित; महावितरण म्हणते अर्ध्या तासावर वीज ‘गुल’ तर फोन करा!

पाऊस येताच वीजपुरवठा खंडित; महावितरण म्हणते अर्ध्या तासावर वीज ‘गुल’ तर फोन करा!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उन्हाळ्यात मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली वीजपुरवठा वेळोवेळी खंडित करण्यात आला. प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होताच वीज गेल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पाऊस नसतानाही वेळी-अवेळी वीज ‘गुल’ होण्याचा प्रकारही सुरूच आहे. त्यातही अर्ध्या तासावर वीजपुरवठा खंडित झाला तरच महावितरण नोंद घेते, अन्यथा नाही.

शहरात १० जून आणि १४ जून रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या दोन्ही दिवशी झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. विद्युत वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित होणे स्वाभाविक आहे. परंतु, पावसाचे चार-पाच थेंब पडत नाही, तोच लाईट जात असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्रत्येक वर्षी हाच त्रास किती दिवस सहन करायचा, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यातही १५ ते २० मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होण्याची महावितरण नोंदच घेत नसल्याचे सांगण्यात आले. ट्रिपिंग झाल्यास वीजपुरवठा काही वेळातच सुरळीत होतो. परंतु, बिघाड (ब्रेकडाऊन) झाला तर दुरुस्तीनंतरच वीजपुरवठा सुरळीत होतो. शहरात गुरुवारी कुठेही खूप वेळ वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार नव्हता, असेही महावितरणने स्पष्ट केले.

किती फिडर पडले बंद?
शहरात बुधवारी सायंकाळी विविध भागांतील २० फिडर बंद पडले. त्यामुळे कुठे तासभर, तर कुठे चार तास ‘बत्ती गुल’ होती.

नियंत्रण कक्षाला किती तक्रारी?
महावितरणच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी तब्बल ३३९ तक्रारी आल्या. या कक्षाचा क्रमांक नागरिकांच्या तक्रारीने सतत ‘खणखणत’ असतो.

वारंवार फोन केल्याने कामात व्यत्यय
पावसाळ्यात वादळ वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तथापि, ग्राहकांनी १५ ते २० मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन केल्यास त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा; जेणेकरून महावितरण कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करता येईल, असे महावितरणने कळविले आहे.

Web Title: Power cut when it rains; Mahavitaran says if the power goes out for half an hour, then call!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.