सत्तेचे समीकरण बदलले
By Admin | Published: July 14, 2015 12:33 AM2015-07-14T00:33:02+5:302015-07-14T00:33:02+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद औरंगाबाद तालुका व फुलंब्री तालुक्यात आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आ. कल्याण काळे यांनी
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
औरंगाबाद तालुका व फुलंब्री तालुक्यात आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आ. कल्याण काळे यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. मात्र, फुलंब्री तालुका खरेदी-विक्री संघात काळे यांनी १७ पैकी १६ जागांवर आपले उमेदवार निवडून आणत तालुक्यातील राजकारणात जोरदार पुनरागमन केले. सोमवारी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही काळे यांनी बागडेंच्या पॅनलपेक्षा एक जास्त उमेदवार निवडून आणून येथेही मात दिली. मात्र, भाजपमधील दोन बंडखोर उमेदवारांच्या बळावर बाजार समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी आता बागडे ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत २ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्या पुरस्कृत पॅनलला यंदा एकही जागा जिंकता आली नाही. हे सत्तेच्या बदललेल्या समीकरणाचा येत्या देवगिरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीवर परिणाम होईल, हे नाकारता येत नाही.
विधानसभेच्या निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघात कल्याण काळे यांना पराभूत करून १० वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा आमदार बनले. तालुक्यात पुन्हा भाजपची ताकद वाढली. त्यात बागडे यांना विधानसभेचे अध्यक्ष केल्याने तालुक्याला लाल गाडी मिळाली. काँग्रेसला पुन्हा तळापासून कार्यकर्ते सक्रिय करण्यासाठी निवडणुकांची आवश्यकता होती. कल्याण काळे यांनी अपयश पचवत पुन्हा जोमाने संघटनशक्ती उभारण्यास सुरुवात केली. बागडे यांच्या वर्षभराच्या कारभारावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी फुलंब्री तालुका खरेदी-विक्री संघात कल्याण काळे यांच्या पॅनलचे १७ पैकी १६ उमेदवार निवडून आणून, जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. त्या पाठोपाठ औरंगाबाद तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतही युती पुरस्कृत पॅनलच्या बरोबरीने काळे यांच्या पॅनललाही ७ जागा मिळाल्या. यामुळे औरंगाबाद तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. बागडे यांनी सहकारी संस्था विकास पॅनलमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, यामुळे बागडे यांचे खंदे समर्थक संजय औताडे व भाजपचेच विकास दांडगे यांनी बागडे यांच्या विरोधात दंड थोपटले आणि सहकारी संस्था मतदारसंघात सर्वाधिक मतांनी हे दोघे बंडखोर निवडून आले. सहकारी संस्थेत ५ व ग्रामपंचायत मतदारसंघात १ उमेदवार असे ६ उमेदवार बागडे यांच्या पॅनलचे निवडून आले.
दुसरीकडे काँग्रेसमध्ये विलास औताडे व कल्याण काळे यांनी दोन स्वतंत्र पॅनल उभे केल्यामुळे फायदा होईल, असे भाजप-सेनेच्या नेत्यांना वाटत होते; पण मतदारांनी काळे यांच्या पॅनलचे ७ उमेदवार निवडून आणून भाजपच्या वर्चस्वाला शह दिला. या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत शिवशाही विकास पॅनलचा धुवा उडविला. मागील निवडणुकीत बाजार समितीत शिवसेनेचे २ प्रतिनिधी निवडून आले होते. या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. विलास औताडे यांच्या शेतकरी एकता विकास सहकारी पॅनलचेही शिवशाही विकास पॅनलसारखेच हाल झाले.
हरिभाऊ बागडे यांनी आपल्या ज्या दोन समर्थकांना पॅनलमधून डावलले होते आता त्या बंडखोर उमेदवारांसमोरच हात जोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कारण त्या दोघांच्या पाठिंब्याशिवाय बागडे यांना आपल्या पॅनलचा सभापती बनविणे अशक्यच आहे.
फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे मतदान १६ जुलै रोजी होत आहे. या कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी बागडे व कल्याण काळे यांनी प्रचारात जोर ओतला आहे. फुलंब्री व औरंगाबाद तालुका खरेदी विक्री संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील बदललेल्या राजकीय समीकरणाचा कारखाना निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम होतो, कोणाचा चष्मा वरचढ होतो याचे उत्तर आठवड्याच्या शेवटी मिळेल.