औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मिती ठप्प
By Admin | Published: June 18, 2017 12:40 AM2017-06-18T00:40:47+5:302017-06-18T00:43:01+5:30
परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक आठ हा शनिवारी पहाटेपासून बंद ठेवला
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक आठ हा शनिवारी पहाटेपासून बंद ठेवला. संच क्रमांक सहा व संच क्रमांक सात हे दोन संच यापूर्वीच बंद ठेवले आहेत. शनिवारी तीनही संच बंद असल्याने संचातील वीज निर्मिती पूर्णत: ठप्प झाली. एम.ओ.डी. (मेरिट आॅर्डर डिस्पॅच) मध्ये बसत नसल्याने व वीज निर्मितीची मागणी नसल्याने हे संच बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबईवरून महाजनकोचे आदेश येताच पुन्हा हे संच सुरू करण्यात येतील.
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगा वॅट क्षमतेचे ६,७ व ८ हे तीन संच आहेत. या तिन्ही संचांची एकूण ७५० मे.वॅ.एवढी स्थापित क्षमता आहे. शनिवारी राज्यातील नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपुर, भुसावळ या औष्णिक विद्युत केंद्रातील बहुतांश संच चालू होते; परंतू परळी औष्णिक विद्युत केंद्राचे चालू असलेले तिन्ही संच या आठवड्यात बंद ठेवले आहेत. संच क्रमांक चार व पाच हे मागील दोन वर्षांपासून बंद आहेत. राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संच चालू असताना परळीलाच विद्युत निर्मिती खर्च परवडत नसल्याचे नियम दाखवून चालू संच का बंद ठेवले, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ चाटे यांनी केला आहे.