...तर उद्योग बंद पडतील; छत्रपती संभाजीनगरात उद्योजकांनी केली वीजदरवाढ प्रस्तावाची होळी
By बापू सोळुंके | Published: March 1, 2023 04:30 PM2023-03-01T16:30:57+5:302023-03-01T16:31:42+5:30
महावितरणने सुमारे 37% दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे.
छत्रपती संभाजी नगर: महावितरण कंपनीने वीज नियमक आयोगाकडे सरासरी 37% दरवाढ प्रस्ताव सादर केला आहे. ही दरवाढ लागू झाली तर उद्योगांचे कंबरडे मोडेल, अशा संतप्त भावना व्यक्त करत उद्योजक आक्रमक झाले आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी वीजदरवाढ प्रस्तावाचे होळी केली. यावेळी वीज दरवाढ करू नका, वीज दरवाढ प्रस्ताव रद्द करा, महावितरण हाय हाय, अशा घोषणा उद्योजकांनी दिल्या.
महाराष्ट्रात आधीच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत विजेचे दर अधिक आहेत. असे असताना लघुउद्योग अत्यंत कमी मार्जिनवर व्यवसाय करीत आहेत, अशा परिस्थितीत अन्य देशात अन्य राज्यातील उद्योजकांशी स्पर्धा करीत उद्योग टिकवायचा असेल तर यापेक्षा विजेचे दर कमी करावे ,अशी मागणीही उद्योजक करीत आहेत. यासाठी उद्योजकांच्या विविध संघटना शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारची वीज कंपनी असलेल्या महावितरणने सुमारे 37% दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे.
हा प्रस्ताव मान्य झाला तर उद्योग बंद करावे लागेल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. बुधवारी दुपारी वाळूज एमआयडीसीतील विविध उद्योजक संघटनांनी एकत्र येत महावितरण विरुद्ध आंदोलन केले .यावेळी वीज दरवाढ प्रस्तावाची होळी उद्योजकांनी केली. या आंदोलनात मसीआ संघटनेचे अध्यक्ष किरण जगताप ,सचिव राहुल मोगले, उपाध्यक्ष अनिल पाटील, अर्जुन गायकवाड, विकास पाटील, सर्जेराव साळुंखे, लघुउद्योग भारती चे संतोष कुलकर्णी आणि अन्य संघटनेचे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांनी महावितरण विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.