सोयगाव परिसरात वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:02 AM2021-02-15T04:02:06+5:302021-02-15T04:02:06+5:30
सोयगाव : तालुक्यात थकबाकीच्या नावाखाली महावितरणकडून शेतीपंपाच्या वीजजोडण्या खंडित केल्या जात आहेत. रब्बी पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न ...
सोयगाव : तालुक्यात थकबाकीच्या नावाखाली महावितरणकडून शेतीपंपाच्या वीजजोडण्या खंडित केल्या जात आहेत. रब्बी पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे असून, महावितरणविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
सुरुवातीपासूनच वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. सातत्याने विजेचा लंपडाव सुरू असल्याने शेतकरी बांधव त्रस्त झालेले होते. त्यात उन्हाळ्याचा कहर वाढू लागला, तर दुसरीकडे रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली. थकबाकी वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्री शेतशिवारात जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांना अंधारात राहावे लागत असून शेतकरी रात्री जनावरांना चारापाणी देण्यासाठी जातात. वीज नसल्याने विहिरीतील पाणी काढायचे कसे, जनावरांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पिकांबरोबरच जनावरांना देखील पाणी मिळत नसल्याचे शेतकरी तोसीफ शेख, जमील तडवी यांनी सांगितले.
सोयगाव मंडलाची अंतिम आणेवारी ४७ पैसे
सोयगाव तालुक्याची खरिपाची अंतिम आणेवारी ४७ पैसे जाहीर झालेली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार पन्नास टक्क्यांच्या आत आणेवारी असलेल्या तालुक्याची वीज जोडणीशिवाय कोणतीही सक्तीची वसुली करू नये, असे आदेश शासनाने काढलेले आहेत. परंतु शासनाच्या या आदेशालाच महावितरणने केराची टोपली दाखविली आहे. शेतकऱ्यांना धारेवर धरून सक्तीची वीजबिल वसुली केली जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही गप्प का? असा प्रश्न जनतेतून केला जात आहे.