विजेच्या समस्यांनी ग्राहक त्रस्त
By Admin | Published: June 12, 2014 11:41 PM2014-06-12T23:41:33+5:302014-06-13T00:34:33+5:30
वाशी : वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही.
वाशी : वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्याचबरोबर ठिकठिकाणी लोंबकाळणाऱ्या तारा आणि नादुरुस्त डीपींकडे दुर्लक्ष होत असून, साहित्याचा तुटवडा असल्याचे कारण देत किरोकळ दुरूस्तीलाही विलंब लावला जात असल्याने विजेबाबतच्या समस्यांना ग्राहक वैतागल्याचे दिसत आहे.
तालुक्यात साडेसहाशे विद्युत डीपी असून, यापैकी ४७५ डीपी या शेतीपंपासाठी तर उर्वरित घरगुती, वाणिज्य वापरासाठी आहेत. सर्व डीपीच्या देखभालीसाठी तालुक्यात २२ लाईनमन असून, त्यापैकी चौघे निलंबित आहेत. तर केवळ एकाच लाईनमनवर शहराची मदार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाल्याचे दिसते. शेतातील अनेक वीज वाहिन्या जमिनीलगत झुकलेल्या असून, काही ठिकाणचे पोल वाकडे झालेले आहेत. डीपींचीही अशीच दुरवस्था आहे. अनेक डीपीत फ्यूज नाहीत, तर काही डीपीतील आॅईलची पातळी खालावल्याचे दिसते. जेव्हा एखादा डीपी जळतो, त्याच वेळी त्याच्याकडे पाहिले जाते. शिवाय, हा डीपी काढणे, त्याची वाहतूक आदी खर्चाचा भुर्दंडही ग्राहकांनाच सहन करावा लागतो, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. वीज कंपनी कार्यालयात फ्यूज वायरसह इतर अनेक साहित्याचा तुटवडा असल्याचेही सांगितले जाते. (वार्ताहर)
तालुक्यात अनेक ग्राहकांकडे वीज बिल थकले आहे. यासाठी वीज कंपनीच्या उस्मानाबाद येथील विधि अधिकाऱ्याकडून सध्या कायदेशीर नोटिसा पाठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कदाचित पुढील आठवड्यात या नोटिसा ग्राहकांच्या हातात पडण्याचीही शक्यता आहे. सदर नोटिसीत ‘वीज कंपनीने केलेल्या करारानुसार व महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाने ठरवलेल्या दरानुसार व नियमानुसार आपण वीज बिल देण्याचे मान्य केलेले असून, त्या अटीनुसार आपणास वीज पुरवठा केलेला आहे. मात्र, आपणास वीज बील देऊनही आपण त्याचा भरणा केलेला नाही. त्यामुळे आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच थकित रकमेवर १८ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल व न्यायालयात आपल्याविरूध्द योग्य ती कारवाही करण्यात येईल’, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ऐन खरीप पेरणीच्या तोंडावरच या नोटिसा बजावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार आहे.
राष्ट्रीयकृत बँकेत बिल भरणा हवा
वाशी शहरासह तालुक्यातील विद्युत ग्राहकांना विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज कंपनीच्या कार्यालयात जावे लागत असून, हे कार्यालय शहरापासून दूर आहे. विशेषत: वयोवृध्द व महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदरचा भरणा येथील राष्ट्रीयकृत बँकेत करण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी ग्राहकातून होत आहे.
बिलांच्या दुरुस्तीसाठी हेलपाटे
तालुक्यात शेतीपंपाचे ९०५३, घरगुती ११९७, वाणिज्य ६७२, औद्यगिक १८६ तर पाणीपुरवठा वापराचे ६९ ग्राहक आहेत. याचा हिशोब ठेवण्यासाठी येथील उपविभागीय कार्यालयात सहाय्यक अभियंता, उपअभियंत्यासह दहा कर्मचारी असून, त्यांच्याकडून चुकीच्या बिलांची दुरूस्ती व इतर कामेही वेळेत होत नसल्याने ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. येथील सहाय्यक अभियंता हे मुख्यालयात राहत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नुकताच याचा अनुभव आला. गेल्याच आठवड्यात त्यांनी येथे भेट दिली असता सहाय्यक अभियंता उपस्थित नसल्याने त्यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.