औरंगाबादच्या वस्तुसंग्रहालयात दिसतो चित्ररुपी शिवरायांचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 07:12 PM2018-02-19T19:12:20+5:302018-02-19T19:17:22+5:30

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे, ते कसे राहायचे, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, त्यांचे ‘मूळ’ रूप कसे होते हे पाहायचे असेल तर औरंगाबाद येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट देणे अनिवार्य आहे.

the power of Shivaji maharaj shown on picture in the museum of Aurangabad | औरंगाबादच्या वस्तुसंग्रहालयात दिसतो चित्ररुपी शिवरायांचा प्रताप

औरंगाबादच्या वस्तुसंग्रहालयात दिसतो चित्ररुपी शिवरायांचा प्रताप

googlenewsNext
ठळक मुद्देशिवरायांना अनेक कलावंतांनी आपापल्या कल्पनाशक्ती व सृजनशीलतेनुसार विविध रुपांमध्ये साकारलेले आहे. महाराजांच्या काळात काढलेली त्यांची चित्रे अत्यंत दुर्मिळ अशी आहेत. त्यापैकी दोन मूळ चित्रांची प्रतिचित्रे या संग्रहालयात पाहायला मिळतात.

- मयूर देवकर 

औरंगाबाद : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे, ते कसे राहायचे, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, त्यांचे ‘मूळ’ रूप कसे होते हे पाहायचे असेल तर औरंगाबाद येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट देणे अनिवार्य आहे. शिवरायांना अनेक कलावंतांनी आपापल्या कल्पनाशक्ती व सृजनशीलतेनुसार विविध रुपांमध्ये साकारलेले आहे. त्यांची अनेक चित्रे, पोस्टर्स बाजारात-इंटरनेटवर उपलब्ध आहेत. परंतु महाराजांच्या काळात काढलेली त्यांची चित्रे अत्यंत दुर्मिळ अशी आहेत. त्यापैकी दोन मूळ चित्रांची प्रतिचित्रे या संग्रहालयात पाहायला मिळतात.

संग्रहालयाचे क्युरेटर आणि चित्रकार सर्वेश नांद्रेकर यांनी शिवाजी महाराजांच्या दोन मूळ लघुचित्रांची प्रतिकृती रंगविलेली आहे. ‘चित्रपट, कथा-कादंबर्‍या आणि आख्यायिकांतून लोकांच्या मनात शिवाजी महाराजांची विशिष्ट अशी एक प्रतिमा असते. परंतु महाराज खरे कसे दिसायचे याची फारशी माहिती त्यांना नसते. त्यामुळे जेव्हा हे संग्रहालय सुरू करण्यात आले तेव्हा लोकांना महाराजांचे खरेखुरे रूप पाहायला मिळावे या हेतूने ही चित्रे रंगविली, असे नांद्रेकर सांगतात. शासकीय कला महाविद्यालयातून त्यांचे फाईन आर्टस् विषयात पदवी शिक्षण तर इतिहास विषयात पीएच. डी. झालेली आहे.

शिवकालीन समाजजीवनाचा परिचय घडवून आणणार्‍या महापालिकेच्या  वस्तुसंग्रहालयात शिवरायांची दोन प्रतिचित्रे आहेत. यापैकी एक म्हणजे मीर महंमदने काढलेले चित्र व दुसरे म्हणजे निनावी चित्रकाराने काढलेले महाराजांचे व्यक्तिचित्र आहे. दोन्ही मूळ चित्रे ही शिवरायांच्या काळातच काढण्यात आलेली असून, दोन्ही लघुचित्रे आहेत. मूळ चित्रातील बारकावे, रंगसंगती, शैली यांचा पाच वर्षे सूक्ष्म अभ्यास करूनच नांद्रेकर यांनी त्यांची प्रतिकृती तयार केली. 

शिवाजी महाराज जेव्हा आग्रा येथे गेले होते तेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या सैन्यासोबत असणार्‍या मीर महंमद या चित्रकाराने महाराजांचे घोड्यावर बसलेले चित्र काढले होते. यामध्ये महाराजांभोवती सुरक्षारक्षकांचे कडे दाखविण्यात आले आहे. हे मूळ चित्र सध्या पॅरिस येथील एका संग्रहालयात आहे. दुसर्‍या चित्रांमध्ये महाराजांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व कसे असेल याची कल्पना येते. हे चित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेले आहे.

लोकांच्या मनातील समज-गैरसमज
संग्रहालयाला भेट देणार्‍या अनेकांच्या मनात महाराजांची केवळ योद्धा म्हणून प्रतिमा बिंबवलेली असते. त्यांना रणांगणात शौर्य गाजविणारे शिवाजी महाराज पाहायचे असते. परंतु या चित्रांमधून महाराजांचे प्रशासक म्हणून व्यक्तिमत्त्व समोर येते. राजा म्हणून त्यांचा रुबाब, त्यांची अदब दिसून येते, असे नांद्रेकर सांगतात. ‘आपल्याकडे लोक मूळ इतिहास समजून घेण्यापेक्षा कथा-कादंबर्‍यांवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे आजच्या कलाकारांनी चित्रांच्या माध्यमातून त्या काळातील खरा इतिहास लोकांसमोर आणावा’, अशी अपेक्षा नांद्रेकर व्यक्त करतात.

लाईफ साईज चित्रे
मूळ चित्रे जरी दखनी शैलीतील लघुचित्रे असली तरी नांद्रेकर यांनी मोठ्या आकारात ती साकारली आहेत. मीर महंमदने चितारलेल्या चित्रांची प्रतिकृती १.५ फूट बाय ३ फूट आणि व्यक्तिचित्रे ५ फूट बाय ७ फूट आकाराची आहेत. याबरोबरच येथे संभाजी महाराजांचेदेखील याच आकारातील व्यक्तिचित्र आहे. ‘जलरंगात साकारलेली ही चित्रे काढणे मोठे आव्हान होते’, असे ते सांगतात. चित्रांसाठी वापरण्यात आलेली चौकट (फ्रे म) सुद्धा शिवकालीन काष्ठशिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. 

एक चित्र म्हणजे एक ग्रंथ
समकालीन चित्रे, लेख, शिल्प, वास्तू, साहित्य यामधून त्या काळातील वस्तुस्थिती कळते. टीव्ही मालिका किंवा चित्रपटांतून अनेकदा कल्पनाविलास आणि रंजकतेपोटी खरा इतिहास मागे पडतो. त्यामुळे शिवाजी महाराज समजून घ्यायचे तर अशा संग्रहालयाला भेट द्यावी लागते. महाराजांचे चित्र काढण्याची प्रेरणा सांगताना नांद्रेकर सांगतात, ‘एका चित्रातून एका ग्रंथाएवढी माहिती कळते. या चित्रांमधून शिवरायांची वेशभूषा, केशभूषा, शस्त्रे, व्यक्तिमत्त्व दिसून येते. हे लोकांनी पाहावे, अनुभवावे हीच चित्रांमागची प्रेरणा.’

Web Title: the power of Shivaji maharaj shown on picture in the museum of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.