फुलंब्री तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:02 AM2021-09-22T04:02:12+5:302021-09-22T04:02:12+5:30
फुलंब्री : तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे १९ कोटींची बिले थकली आहेत. त्यामुळे महावितरणने वीज बिल थकीत केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाईचा ...
फुलंब्री : तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे १९ कोटींची बिले थकली आहेत. त्यामुळे महावितरणने वीज बिल थकीत केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांपूर्वीच या ५६ गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने कापला आहे. त्यामुळे गावागावांत पाण्याची बोंब उठली असून, ग्रामपंचायतअंतर्गत असलेले पथदिवे बंद पडले आहेत.
फुलंब्री तालुक्यात एकूण ६८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५६ ग्रामपंचायतींकडे १९ कोटींची थकबाकी आहे. महावितरणकडून गेल्या काही वर्षांपासून वीज बिल भरण्यासाठी अनेक वेळा सवलती देण्यात आल्या. या बिलातील रक्कम कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या संधीदेखील देण्यात आल्या; पण याकडे एकाही ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही. परिणामी, दोन दिवसांपूर्वी महावितरणने कारवाईचा बडगा उगारत थकबाकी गावांतील वीजपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईने ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले आहे.
-----
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींत पाणीपुरवठा करणारी ११८ कनेक्शन्स आहेत, तर १०४ पथदिवे कनेक्शन्सचा समावेश आहे. यात पाणीपुरवठ्याचे ७ कोटी व पथदिव्यांची १२ कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. ही थकबाकी मागील अनेक वर्षांपासूनची आहे. विजेचा वापर करायचा; पण बिल भरण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायचा नाही.
----
ग्रामपंचायतीकडून ऐनवेळेवर जुळवाजुळव
पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा विद्युत पुरवठा अचानक कापला गेल्याने अनेक गावांतील ग्रामपंचायती अडचणीत आल्या आहेत. ऐनवेळेवर धावपळ सुरू झाली. ग्रामस्थांना पाणीपुरवठा करायचा तरी कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. गावात पथदिवे बंद पडल्याने सर्वत्र अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आहे, तर थकबाकी भरण्यासाठी काही ठिकाणी जुळवाजुळव सुरू झाली होती.
---
कोट
गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात ग्राहकांना आम्ही अहोरात्र सुरळीत वीजपुरवठा दिला. वीज कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता कामे केलीत; पण तरीदेखील ग्राहक बिल भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. विशेषकरून तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे सर्वाधिक थकबाकी असल्याने महावितरण अडचणीत आले आहे. त्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.
-अरुण गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण
------
कोट
ग्रामपंचायतीकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी आहे; पण वीजपुरवठा एकदम बंद करणे हा त्याला योग्य पर्याय नाही. कोरोना परिस्थितीत ग्रामपंचायतीकडे पूर्ण बिल भरण्याइतके पैसे नाहीत. जानेवारी २०२१ पासूनचे बिल वेगळे करून द्यावे, जेणेकरून बिल भरणा करता येईल.
-किशोर चव्हाण, उपसरपंच, किनगाव ग्रा.पं.