औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 07:08 PM2018-03-21T19:08:11+5:302018-03-21T19:09:59+5:30

औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे.

The power supply of 68 villages in two districts of Aurangabad and Jalna is permanently broken | औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तीन गावे, तर जालना जिल्ह्यातील उर्वरित ६५ गावांचा समावेश असून सध्या ही गावे आपले दैनंदिन व्यवहार अंधारातच पार पाडत आहेत.

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एक मार्चपासून थकबाकीदार ग्राहकांच्या विरोधात महावितरणने थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरू केली. शहरात ६० हजार ग्राहकांकडे ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या २० दिवसांच्या कालावधीत अवघी १४ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. शहरामधील थकबाकीदार ग्राहकांनी या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यामुळे तब्बल २४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. औरंगाबाद  आणि जालना जिल्ह्यांमध्ये १ लाख ९७ हजार ५८९ ग्राहकांकडे  जवळपास १४४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. 

औरंगाबाद शहरात विभाग क्रमांक एक आणि क्रमांक दोनमध्ये ६० हजार ४९८ वीजग्राहकांकडे ७५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत जीवतोडून परिश्रम घेत असून, थकबाकीदार ग्राहकांकडून १४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश मिळविले आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वसुली होत नसल्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. १ मार्चपासून २४ हजार ३१४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात, तर ३७३ ग्राहकांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे २ कोटी १३ लाख रुपये थकबाकी आहे.

ही गावे आहेत अंधारात
कन्नड विभागांतर्गत अंबाला, भडली, खर्डी या तीन गावांचा संपूर्ण वीजपुरवठा कापण्यात आला आहे. याशिवाय जालना विभाग क्रमांक एकमध्ये काजळा, नांदापूर, वरखेडा, बेठलम, इंदलकरवाडी, धार, धावेडी, बोरगाव, बीबी, निरखेडा या दहा गावांचा आणि जालना विभाग क्रमांक दोनमध्ये शेरगोडा, अंगलगाव, डोलारा, पांडे पोखरी, सुरमगाव, हातडी, परवाडी, वडारवाडी, वाळखेड, घाणेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, विरेगाव, कोटला, गुंज, घोसी, बंगालेवाडी, मुधेगावा, चपडगाव, मानेपुरी, बोरगाव तांडा, भायगव्हाण, मंगरूळ, अंभोडा खुर्द, वीरगव्हाण, मुरूमखेडा, तालटोंडी, ठेगेवदगव्हाण, पांगरी वायाळ, वाधेगाव, वाघोडा, वाघला, सहद वडगाव, वरूड, वझर सरकटे, वाधोना, खडकी, जयपूर, भांबेरी, दोडगव्हाण, सौंदलगाव, डोमेगाव, रेणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, जालोरा, करंजळा, कुरण, डोमलगाव, चर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Web Title: The power supply of 68 villages in two districts of Aurangabad and Jalna is permanently broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.