गंगापूरच्या पंपहाऊसचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:04 AM2021-03-24T04:04:31+5:302021-03-24T04:04:31+5:30
गंगापूर : मार्च एंडमुळे महावितरणकडून सध्या वसुली सुरू आहे. शेती व उद्योगानंतर त्यांनी आपला मोर्चा आता नगरपालिकेकडे वळविला आहे. ...
गंगापूर : मार्च एंडमुळे महावितरणकडून सध्या वसुली सुरू आहे. शेती व उद्योगानंतर त्यांनी आपला मोर्चा आता नगरपालिकेकडे वळविला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कायगाव येथील पंप हाऊसची थकबाकी न भरल्याने महावितरणने पंपहाऊसचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसह शहरवासीयांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
कायगाव येथील नगरपरिषद पंपहाऊसद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापोटी महावितरणचे न. प.कडे गेल्या पंचवीस वर्षांपासून ते आजतागायत एकूण ७५ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीपैकी नगरपालिकेने चालू महिन्यात तीन टप्प्यांमध्ये दहा लाख रुपयांचा भरणा केला आहे. उर्वरित रक्कम लवकरात लवकर भरणा करण्यात येईल असे कळविले. तरी देखील महावितरणने सदरील पंप हाऊसचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहरात सध्या ८९ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, त्यांची स्वच्छता, देखभाल व त्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. या महामारीच्या काळात इतर आस्थापनांकडून सहकार्य होत असताना महावितरणच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमुळे या वर्षी वसुली अत्यल्प असतानाही आम्ही थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यास बांधील आहोत. आमची देखील महावितरणकडे दीड कोटीच्यावर थकबाकी असून, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्याप्रमाणे महावितरणने देखील सहकार्य करून वीजपुरवठा पूर्ववत करावा. - वंदना प्रदीप पाटील, नगराध्यक्षा, गंगापूर.
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन आम्ही करत असून, जनभावना लक्षात घेऊनच सर्वांत शेवटी नगरपालिकेचा पुरवठा खंडित केला आहे. आमच्याकडे असलेल्या थकबाकीसाठी त्यांच्याकडून कोणतीही नोटीस आम्हाला मिळालेली नाही.
- रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.