सोयगावात बंद रोहीत्रामध्ये अचानक उतरला वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:37 PM2018-07-13T13:37:12+5:302018-07-13T13:38:59+5:30
सोयगाव ( औरंगाबाद ) : तालुक्यातील निंबायती गावच्या शेत रस्तावरील बंद असलेल्या रोहीत्रामध्ये अचानक वीज पुरवठा उतरला. याच वेळी ...
सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील निंबायती गावच्या शेत रस्तावरील बंद असलेल्या रोहीत्रामध्ये अचानक वीज पुरवठा उतरला. याच वेळी तेथून जाणारी एक गाय त्यास चिकटल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक गाईला तेथून बाहेर काढून तिचे प्राण वाचवले.
निंबायती गावच्या शिवार वाटेवर महावितरणचे एक बंद पडलेले रोहित्र आहे. काही दिवसांपूर्वी या रोहीत्रामध्ये वीज पुरवठ्याबाबत महावितरणाने प्रात्यक्षिक घेतले. त्यानंतर आज पहाटे अचानक यात वीज पुरवठा उतरला. याच दरम्यान तेथून जाणाऱ्या गाईच्या कळपातील एक गाय विद्युत प्रवासाहामुळे रोहीत्रास चिकटली. हे लक्षात येताच ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक त्या गाईस तेथून सुखरूप बाहेर काढले.
वीज प्रवाहाबाबत ग्रामस्थांना माहिती नाही
या रोहित्राजवळूनच शेत मजुरांची शेतात जाण्याची वाट आहे. पावसामुळे या परिसरात ओलावा निर्माण झाला आहे. यामुळे आता येथून जाणे धोकादायक ठरत आहे. यातील वीज पुरवठा सुरळीत झाला कि बंद आहे याची ग्रामस्थांना काही कल्पना नाही. यामुळे महावितरणाने या रोहित्रातील वीज पुरवठ्याची माहिती देऊन त्याभोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.