पैठण एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत शक्तिशाली स्फोट; १० किमीचा परिसर हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 04:36 PM2020-04-22T16:36:47+5:302020-04-22T16:43:56+5:30

कंपनीला लागून असलेल्या अनेक कंपण्यांच्या बांधकामास तडे गेले असून खिडक्याच्या काचा फुटल्या

Powerful blast at Paithan MIDC chemical company; 10 km area shaken | पैठण एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत शक्तिशाली स्फोट; १० किमीचा परिसर हादरला

पैठण एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत शक्तिशाली स्फोट; १० किमीचा परिसर हादरला

googlenewsNext
ठळक मुद्देसुदैवाने या स्फोटात जीवीत हानी झाली नाहीकंपनी सुरू असल्याची पोलिसांना खबरच नाही.....

पैठण : पैठण एमआयडीसी मधील शालीनी केमीकल कंपनीच्या स्टोरेज टँकचा आज  सकाळी शक्तिशाली स्फोट झाला. स्फोटाचा आवाज पैठण शहरासह १० कि मी परिघात दणाणला. कंपनीला लागून असलेल्या मुधलवाडी गावात स्फोटाची राख जाऊन पडल्याने या गावात काही काळ घबराट पसरली होती. शालीनी केमीकल कंपनीला लागून असलेल्या अनेक कंपण्यांच्या बांधकामास तडे गेले असून खिडक्याच्या काचा फुटल्या. सुदैवाने या स्फोटात जीवीत हानी झाली नसून घटनेचा पैठण औद्योगिक वसाहत पोलीसांनी  पंचनामा केला आहे.

आज सकाळी ७ वाजून पाच मिनिटांनी पैठण औद्योगिक वसाहतीत असलेल्या शालीनी केमीकल कंपनीच्या स्टोरेज टँक च्या शक्तीशाली स्फोटाने  परिसर हादरला. स्फोट झाल्यानंतर केमीकलच्या धुराचे  लोट कंपनीतून आकाशात जाताना दिसून आले. कंपनीला आग लागली असे समजून औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन विभागाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
शालीनी केमीकल मध्ये अलबेंडाझोल नावाचे रसायन तयार करून ते सप्लाय केले जाते कंपनी मध्ये हे रसायन साठवण्यासाठी आठ टँक असून या आठ टँक पैकी एका टँकचा  आज स्फोट झाला.  ओव्हर हिट झाल्यामुळें टँकचा स्फोट झाला असावा अशी शक्यता कंपनीचे मँनेजर रामेश्वर सुरवसे यांनी व्यक्त केली.

शक्तीशाली स्फोट...
सकाळी झालेल्या शक्तीशाली स्फोटाने एमआयडीसी परिसरातील अन्य कंपन्यांना हादरा बसला. शालीनी केमिकलची आर्धी ईमारत व केमीकल मशिनरी जमीनदोस्त झाली. स्फोटाचा आवाज १० किलोमीटर परिघात ऐकू आला. स्फोटानंतर उडालेले धुराचे लोट सुध्दा परिसरातील अनेक गावातून नागरिकांना दिसत होते.

मुधलवाडी भयभीत.....
स्फोटाच्या आवाजा नंतर मुधलवाडी परिसरात राख पडून गाव हादरल्याने गावकरी भयभीत झाले. थोडावेळ गावातील नागरिक घराचे दरवाजे खिडक्या बंद करून घरात बसले, माजी सरपंच भाऊ लबडे यांनी गावकऱ्यांना धीर दिल्याने हळूहळू नागरिक घराबाहेर आले. दरम्यान या कंपनीच्या प्रदुषणामुळे डोळ्याची जळजळ व छातीत त्रास होतो असे भाऊ लबडे यांनी सांगितले. या बाबत प्रदुषण महामंडळाकडे अनेक वेळा तक्रारही करण्यात आली. परंतू, उपयोग झाला नाही असे गावकऱ्यांनी सांगितले.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती...
अत्यावश्यक सेवे अंतर्गत शालिनी केमीकल कंपनीला लॉकडाऊनचे नियम व  अटी पाळून प्रोडक्शन करण्याची परवानगी पाच दिवसापूर्वी मिळाली होती. कंपनीत एकूण १६ कर्मचारी असून लॉकडाऊन कालावधीत चार कर्मचारी कार्यरत ठेवून कंपनीने प्रोडक्शन करण्यात येत होते. आज सकाळी ७ वाजेला काम संपल्याने चारही कर्मचारी घरी जाण्यासाठी गेटवर आले होते. तर कामासाठी आलेले गेटवरच होते नेमका तेव्हाच शक्तीशाली स्फोट झाला व कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. स्फोट पाच मिनिटे आधी किंवा पाच मिनिटे नंतर असा केव्हाही झाला असता तर जीवीत हानी अटळ होती यामुळेच काळा आला होता परंतु वेळ आली नव्हती अशी चर्चा औद्योगिक वसाहतीत आज होत होती.

पैठण औद्योगिक वसाहतीत ए ७५ प्लॉटवर औषधी व फुड प्रॉडक्ट कंपन्यांना कच्च्या केमीकलचा पुरवठा करणारी शालिनी केमीकल कंपनी २०१५ पासून सुरू आहे. प्रामुख्याने लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या जंतूनाशक औषधासाठी लागणारे कच्चे रसायन या कंपनीतून महाड येथे सप्लाय केले जाते, असे कंपनीचे व्यवस्थापक रामेश्वर सुरवसे यांनी सांगितले. दरम्यान कंपनीचे मालक शिरिष कुलकर्णी हे औरंगाबाद येथील रहिवाशी असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले.

कंपनी सुरू असल्याची पोलिसांना खबरच नाही.....
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पाठिमागील भागात शालीनी केमिकल कंपनी आहे. दरम्यान लॉकडाऊन नंतर सर्वच कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या. अत्यावश्यक सेवेखाली पाच कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. स्फोट झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी आलेल्या  सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी स्फोटाने हादरलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकास कंपनी सुरू केली आम्हाला का कळवळे नाही असे म्हणत चांगलेच धारेवर धरले. या मुळे  एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या पाठीमागील कंपनी सुरू झाल्याची खबर नसल्याचे सत्य समोर आले

Web Title: Powerful blast at Paithan MIDC chemical company; 10 km area shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.