एप्रिलमध्ये होणार प्रात्यक्षिक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:04 AM2021-03-09T04:04:31+5:302021-03-09T04:04:31+5:30
औरंगाबाद : सुरक्षित अंतर, मास्कसह विविध कोरोनासंबंधीच्या उपाययोजना करून दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य मंडळाने सूचना दिल्या आहेत. ...
औरंगाबाद : सुरक्षित अंतर, मास्कसह विविध कोरोनासंबंधीच्या उपाययोजना करून दहावी- बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी राज्य मंडळाने सूचना दिल्या आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ५ ते २२ एप्रिल तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या १२ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेत कसोटी लागणार आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लेखी परीक्षा एप्रिल ते मे दरम्यान होणार आहेत. त्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षेची काळजी घेत बाह्य परीक्षकांची नेमणूक करून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत कोरोनाचे नियम पाळून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी १ लाख ८३ हजार ६११ तर बारावीच्या १ लाख ५१ हजार ८४७ अशा एकूण ३ लाख ३५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅचचे नियोजन करण्याच्या सूचनाही राज्य मंडळाने दिल्या आहेत, असे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.