प्रदीप जैस्वाल अटकेत; जेलमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:36 AM2018-05-22T00:36:14+5:302018-05-22T00:38:19+5:30
दंगलीप्रकरणी अटक केलेल्या गांधीनगर येथील दोन आरोपींना जामिनावर सोडावे, यासाठी शिवसेना महानगरप्रमुख माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी रात्री क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारांशी हुज्जत घातली आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांना शिवीगाळ करून टेबलावरील काच फोडून खुर्च्यांची मोडतोड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दंगलीप्रकरणी अटक केलेल्या गांधीनगर येथील दोन आरोपींना जामिनावर सोडावे, यासाठी शिवसेना महानगरप्रमुख माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी रात्री क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारांशी हुज्जत घातली आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांना शिवीगाळ करून टेबलावरील काच फोडून खुर्च्यांची मोडतोड केली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी जैस्वालविरोधात गुन्हा नोंदविला. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारत त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली. याविषयी माहिती मिळताच रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मा.आ. प्रदीप जैस्वाल हे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे खुर्चीवर बसलेले होते. यावेळी ते गांधीनगर येथील आरोपींना जामिनावर सोडा, असे म्हणाले. आरोपींना अटक करणारे सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल आहेत. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतो, असे पोहेकॉ. पोटे यांनी सांगितले. सपोनि. शेख हे लगेच ठाण्यात आले आणि त्यांनी जैस्वाल यांना सांगितले की, गांधीनगर येथूनच दंगलीला सुरुवात झाली आहे, या गुन्ह्याचा तपास करायचा आहे. काही वेळानंतर जैस्वाल यांनी ठाणे अंमलदार पोटे यांना तुम्ही तुमचे काम बंद करा, आताच्या आता तुमच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलवा, तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत, असे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना त्यांनी शिवीगाळ केली. उद्या शहरामध्ये काय घडते ते बघा, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्यांनी पेन स्टॅण्डने टेबलावरील काच फोडली. यावेळी त्यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्त्यांनी आणि सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी जैस्वाल यांना समजावून सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते त्यांना घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने पोहेकॉ. पोटे यांनी जैस्वालविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाºयांना धमकावणे आणि अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदविला.
क्रांतीचौक ठाण्यातील सीसीटीव्ही बंद
क्रांतीचौक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेºयांचे नियंत्रण पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये आहे. मात्र ठाण्यातील काही कॅमेरे बंद आहेत तर काही सुरू आहेत. रविवारी रात्री पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराच्या कक्षात माजी आमदार जैस्वाल यांनी ठाणेदाराशी हुज्जत घालून तेथील टेबलवरील काच फोडल्याची घटना घडली. कॅमेरा बंद असल्याने ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नाही.
नवीन काच दिली आणून..
जैैस्वाल यांनी पोलीस ठाण्यातील काच फोडल्याचे कळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लगेच धावपळ करून दुसरी काच ठाणेदारांना आणून दिली.