पंतप्रधान आवास योजना घोटाळा: बनावट कागदपत्राच्या आधारे कंपनीस ठरवले भागीदार
By राम शिनगारे | Published: April 19, 2023 07:33 PM2023-04-19T19:33:43+5:302023-04-19T19:34:16+5:30
सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल : या प्रकरणात ईडीने एंन्ट्री मारीत सर्व बिल्डरांची झाडाझडती घेतली.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात तीन कंपन्याच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एंन्ट्री मारीत सर्व बिल्डरांची झाडाझडती घेतली. तीन कंपन्यापैकी एक असलेल्या जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीने बनावट कागदपत्रे तयार करून न्याती इंजिनीअर्स ॲण्ड कन्सलटंटस् प्रा.लि. कंपनी भागीदार असल्याचे दाखविले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने जग्वार कंपनीच्या दोन आणि गंजाळ ॲण्ड असोसिएटसच्या एक संचालकाच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
आरोपींमध्ये जग्वार ग्लोबल सर्व्हिसेसचे सुनील मिश्रीलाल नहार, आनंद फुलचंद नहार आणि गुंजाळ ॲण्ड असोसिएटसचे मनोज अरुण गुंजाळ यांचा समावेश आहे. न्याती इंजिनीअर्सतर्फे श्रीनिवास अय्यर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत एकाच आयपी ॲड्रेसवरून समरथ मल्टीबीज इंडिया प्रा. लि., इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंपन्यानी निविदा सादर करीत नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे महापालिकेने २३ फेब्रुवारी रोजी तीन कंपन्यांचे संचालक, भागीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. निविदा भरताना जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस व गुंजाळ ॲण्ड असोसिएटसने न्याती इंजिनीअर्स ॲण्ड कन्सलटंटस् प्रा.लि. कंपनी भागीदार असल्याची २२ पानांचे कागदपत्रे महापालिकेला सादर केली होती. त्यामुळे न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पियुष नितीन न्याती व प्रणव नितीन न्याती यांनाही आरोपी करण्यात आले.
मात्र, न्याती कंपनी व जग्वार ग्लोबस सर्व्हिसेसचा कोणताही संबंध नसून, भागीदारीसाठी कोणतेही करार झालेले नसल्याचा दावा न्याती कंपनीतर्फे केला होता. बनावट कागदपत्रे तयार केल्यामुळे जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस व गुंजाळ असोसिएटसच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यातीतर्फे केली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदविला नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने १५६ (३) अंतर्गत गुन्हा नोंदवून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक सुनील कराळे करीत आहेत.