अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्षांवर ‘प्रहार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:41 AM2017-08-02T00:41:49+5:302017-08-02T00:41:49+5:30
प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना मंगळवारी (दि.१) सकाळी १० वाजता घाटी रुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना मंगळवारी (दि.१) सकाळी १० वाजता घाटी रुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली. त्यात गाडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करीत गाडे यांच्यासह अपंगांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यामुळे घाटीमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले.
प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे मंगळवारी जिल्हा परिषदेत आंदोलन होते. त्याविषयी माहिती देण्यासह एका अपंग महिलेस अपंग प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत असल्याने मदत करण्यासाठी शिवाजी गाडे हे सकाळी १० वाजता घाटीतील बाह्यरुग्ण विभागातील अपंगांचा वॉर्ड ११७ मध्ये गेले होते. यावेळी सदर महिला सोबत होती. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे दोन सुरक्षारक्षक तैनात होते. गाडे यांना सुरक्षारक्षकांनी हटकले. सदर महिलेसोबत आल्याचे गाडे यांनी सांगितले; परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांना तेथे थांबण्यास मज्जाव केला. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.
सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की करीत गाडे यांच्या पायावर काठी मारली. यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. रक्तस्त्राव सुरूझाला, अशा अवस्थेत गाडे आणि अपंगांनी थेट वैद्यकीय अधीक्षक सुधीर चौधरी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घाटीत धाव घेतली.
सुरक्षारक्षकांवर कारवाई करण्याची मागणी गाडे आणि इतर अपंगांनी केली. वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षातच गाडे यांच्यावर उपचार करण्यात आले. शिवाजी गाडे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. संजय सातव आणि विकास काळदाते अशी सुरक्षारक्षकांची नावे आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली.