रावसाहेब दानवेंच्या विरोधात प्रहारचा दुसऱ्या दिवशीही जलकुंभावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 02:27 PM2020-12-11T14:27:36+5:302020-12-11T14:39:52+5:30

Agitation Against Raosaheb Danve in Aurangabad आंदोलकांनी दानवे यांचे प्रतीकात्मक दोन पुतळे जाळले,अंगावर रॉकेल ओतत घोषणाबाजी

Prahar's agitation against Raosaheb Danve continued on the second day | रावसाहेब दानवेंच्या विरोधात प्रहारचा दुसऱ्या दिवशीही जलकुंभावर ठिय्या

रावसाहेब दानवेंच्या विरोधात प्रहारचा दुसऱ्या दिवशीही जलकुंभावर ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन   शुक्रवारी आंदोलनस्थळी तहसीलदार दत्ता भारसकर यांनी आंदोलकांची भेट घेतली

औरंगाबाद : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी  मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे २५ ते ३० कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी शिवाजीनगर येथील जलकुंभावर सुरु केलेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरुच आहे. शुक्रवारी आंदोलनस्थळी तहसीलदार दत्ता भारसकर आले. त्यांनी आंदोलंकांशी चर्चा केली. यात काही निष्पन्न झाले नसून  आंदोलक पालकमंत्र्यांची भेट घालून द्या या अटीवर अडून बसले आहेत. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून शिवाजीनगर जलकुंभावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी धाव घेतली.  आंदोलकाशी चर्चा करण्यासाठी ते  जलकुंभावरुन  चढू लागले. मात्र आंदोलक आक्रमक झाल्याने त्यांना तेथून परतावे लागले. आंदोलकापैकी काही जण कपडे काढून घोषणा देत होते तर काही जण  तेथे पडलेले प्लास्टीक कुलरचे खोके आणि लाकडी बॉक्स जाळून लक्ष वेधून घेत होते.  आंदोलकांनी पोलीस आणि जनतेचे लक्ष वेधून घेत दानवे यांचे दोन पुतळे जाळले. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले; परंतु अन्य कार्यकर्त्यांनी त्याला रोखले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची जोरदार घोषणाबाजी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड आदी सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

जलकुंभाखाली पोलिसांचा खडा पहारा 

गुरुवारी पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही. विनंती करूनही आंदोलक जलकुंभावरून खाली उतरत नसल्यामुळे  शेवटी  पोलिसांनी जलकुंभाखाली राहुटी लावून तेथे खडा पहारा सुरू ठेवला. आंदोलकांना कसे उतरावे याचा विचार पोलीस करत होते. दरम्यान, खाली असलेल्या आंदोलकांना पकडले तर जलकुंभावरील  आंदोलक टोकाचे पाऊल उचलतील, अशी पोलिसांना भीती होती. पोलिसांसमोर आंदोलकांनी दानवे यांचे  दोन पुतळे जलकुंभावर नेले. पोलिसांनी त्यांना अडविले नाही.  जलकुंभावर पुतळे नेऊन जोरदार घोषणा देत जाळले. 

जलकुंभावर झोपण्यासाठी कंबळ 
जलकुंभावर चढून दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन  मागण्या मान्य न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीही सुरूच आएह. गुरुवारी रात्री आंदोलकांनी जलकुंभावर पिण्याच्या पाण्याचे जार नेले. रात्री ९:३० वाजता ९ ते १० आंदोलक खाली उतरले आणि उर्वरित आंदोलकांसाठी जेवण घेऊन गेले. थंडीचा त्रास होऊ नये याकरिता आंदोलकांना कंबळ देण्यात आल्या.

काय आहेत मागण्या 
शेतकरीविरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करा. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी

Web Title: Prahar's agitation against Raosaheb Danve continued on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.