प्रशांत बंब यांचा बालेकिल्ला अबाधित; सतीश चव्हाणांचे तगडे आव्हान परतवत विजयी चौकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 04:02 PM2024-11-24T16:02:21+5:302024-11-24T16:04:36+5:30
या मतदारसंघातून विरोधातील तुल्यबळ उमेदवार सतीश चव्हाण यांनी प्रशांत बंब यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते.
- जयेश निरपळ
गंगापूर :गंगापूर -खुलताबाद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी महविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा ५ हजार १५ मतांनी पराभव केला. बंब यांना १ लाख २५ हजार ५५५ मते मिळाली. बंब यांचा लागोपाठ चौथ्यांदा विजय झाला आहे.
या मतदारसंघातून विरोधातील तुल्यबळ उमेदवार सतीश चव्हाण यांनी प्रशांत बंब यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, बंब यांच्या विजयी चौकाराने मतदारसंघावर त्यांची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. बंब यांनी पहिल्याच फेरीत ४५९ मतांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या चार फेऱ्यांपर्यंत बंब आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीअखेर चव्हाण यांनी १ हजार ८९० मतांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या तेराव्या फेरीपर्यंत चव्हाण आघाडीवर होते. मात्र, चौदाव्या फेरीपासून बंब यांनी सातत्याने आघाडी घेतली. क्रमश: आघाडी वाढतच गेली. २७ व्या फेरीअखेर पोस्टल मतांची बेरीज करून बंब यांना विजयी घोषित करण्यात आले. चव्हाण यांना १ लाख २० हजार ५४० मते मिळाली.
विजयाची कारणे:
१.१५ वर्षांत झालेल्या विकासकामांची मतदारांनी दखल घेतली आणि बंब यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला.
२. बंब यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत केलेले पक्के नियोजन आणि कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत घेतलेली मेहनत. दुरावलेल्या जुन्या सहकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील नाराजांना दमदाटी न करता सोबत घेतले.
३. लोकांपर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवल्या. सातत्याने विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या माध्यमातून संपर्क.
पराभवाची कारणे:
विकासाच्या मुद्यांमुळे १५ वर्षांत काय केले, हा एकच मुद्दा कुचकामी ठरला. प्रचारातील विस्कळीतपणा, शिवाय निष्ठेने काम झाले नसल्याचे दिसून येते. आगामी पाच वर्षांत काय काम करणार, याची दिशा मतदारांना फारशी स्पष्ट झाली नाही. महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांवर पाहिजे तेवढा विश्वास न दाखवणे तसेच अतिआत्मविश्वास नडला. प्रचाराची सूत्रे मतदारसंघाऐवजी छत्रपती संभाजीनगर शहरातून हलविल्याने स्थानिक पदाधिकारी नाराज.
उमेदवार पक्ष मिळालेली मते
१. प्रशांत बन्सीलाल बंब, भाजप, १ लाख २५ हजार ५५५,
२. सतीश भानुदास चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, १ लाख २० हजार ५४०.
३. सतीश तेजराव चव्हाण, बहुजन समाज पक्ष, ८४०.
४. अनिता गणेश वैद्य सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पार्टी ३ हजार ४६७.
५. अनिल अशोक चंडालिया, वंचित बहुजन पार्टी ८ हजार ८३९.
६. बाबासाहेब अर्जुन गायकवाड, जय हिंद जय भारत राष्ट्रीय पक्ष, १४६.
७.ॲड. भारत आसाराम फुलारे, राष्ट्रीय मराठा पार्टी ,१८०,
८. अविनाश विजय गायकवाड, अपक्ष, ५१५.
९. किशोर गोरख पवार, अपक्ष, १४३.
१०. गोरख जगन्नाथ इंगळे, अपक्ष, १४८.
११. सतीश हिरालाल चव्हाण, अपक्ष ,७२७.
१२. देवीदास रतन कसबे, अपक्ष, १९२.
१३. पुष्पा अशोक जाधव, अपक्ष, २३३.
१४. बाबासाहेब तात्याराव लगड, अपक्ष, ५४०.
१५. राजेंद्र आसाराम मंजुळे, अपक्ष, ४३३.
१६. शिवाजी बापूराव ठुबे, अपक्ष, १ हजार ७६९.
१७. सुरेश साहेबराव सोनवणे, अपक्ष, ३ हजार ६५८.
१८.डॉ. संजयराव तायडे पाटील, अपक्ष, १९०.
१९. नोटा १ हजार ४६६