महापालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिरासाठी प्रशांत दामलेंचा सर्वाधिक दाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 01:40 PM2022-01-29T13:40:19+5:302022-01-29T13:40:29+5:30

सात स्वारस्यपत्र दाखल झाले असून प्रशांत दामले यांनी ८० लाख रुपये दरवर्षी देण्याची तयारी दर्शवली आहे

Prashant Damle's highest price for Aurangabad Municipal Corporation's Saint Eknath Rangmandir! | महापालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिरासाठी प्रशांत दामलेंचा सर्वाधिक दाम !

महापालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिरासाठी प्रशांत दामलेंचा सर्वाधिक दाम !

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेने ८ कोटी रुपये खर्च करून संत एकनाथ रंगमंदिराचे रुपडे बदलून टाकले. रंगमंदिर चालविण्यासाठी इच्छुक संस्थांकडून महापालिकेने स्वारस्यपत्र मागविले होते. एकूण ७ संस्थांकडून स्वारस्यपत्र प्राप्त झाले असून त्यामध्ये सर्वाधिक दर प्रशांत दामले यांच्या गौरी थिएटरचा आहे. महापालिकेला दरवर्षी ८० लाख रुपये देण्याची तयारी या संस्थेने दाखविल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता निविदा प्रक्रियेद्वारे ८० लाखांपेक्षा जास्त दर देणाऱ्या संस्थांनाच संत एकनाथ रंगमंदिर चालविण्यासाठी देण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली. महापालिका रंगमंदिराचे खाजगीकरण करत नसून, केअर टेकर म्हणून एका संस्थेची नेमणूक करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. रंगमंदिराचा दर्जा चांगला राहावा हा यामागचा प्रशासनाचा उद्देश आहे. कोट्यवधी रुपये खर्च केलेले रंगमंदिर अत्यंत सुंदर आणि देखणे दिसत आहे. रंगमंदिर भविष्यातही असेच अबाधित रहावे, यासाठी महापालिकेने इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले. छाननी अंती प्रशांत दामले यांच्या गौरी थिएटरने सर्वाधिक ८० लाख रुपये प्रतिवर्षी देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी इच्छुकांकडून आलेल्या प्रस्तावाची माहिती घेतली. मालमत्ता विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाणार असून, आता लवकरच यासंदर्भात निविदा काढण्यात येणार आहे. ८० लाखांपेक्षा अधिक दर देणाऱ्या संस्थेला रंगमंदिर चालविण्यासाठी देण्यात येईल, असेही थेटे यांनी सांगितले.

दामले यांचाच व्हिडिओ व्हायरल
२०१७ मध्ये रंगमंदिराच्या दुरवस्थेबद्दल शहरातील कलाप्रेमींनी तीव्र शब्दात महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. प्रशांत दामले यांनीही एक व्हिडिओ व्हायरल केला होता. राज्यभर हा विषय गाजला होता. त्यामुळे महापालिकेने आणखी बदनामी नको म्हणत रंगमंदिर दुरूस्तीसाठी बंद केले होते. आता दामले यांनीच रंगमंदिर चालविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, हे विशेष.

आणखी ७ इच्छुक कोण?
गौरी थिएटर- ८०,००००० रुपये.
सार ग्रुप-१०,००००० रुपये.
संस्कृती क्रिएटिव्ह प्रा. लि.- ६,००००० रुपये.
डी. एस. मार्ट- ५, ४०,००० रुपये.
शिवम् फाउंडेशन- ४, ५०,००० रुपये.
व्हीएनएस सिस्टिम प्रा. लि. - ४, ५०,००० रुपये.
परदेशी ॲडव्हरटायजर्स -१५,००० रुपये.

Web Title: Prashant Damle's highest price for Aurangabad Municipal Corporation's Saint Eknath Rangmandir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.