इन्स्टाग्रामवर 'ट्रेंड इन क्रिप्टो' च्या नावाखाली देशभर फसवणूक; आरोपी निघाला मोबाइल विक्रेता
By सुमित डोळे | Published: October 27, 2023 11:50 AM2023-10-27T11:50:22+5:302023-10-27T11:51:59+5:30
ग्रामीण सायबर पोलिसांकडून सुरतमधून अटक
छत्रपती संभाजीनगर : सुरतच्या मोबाइल विक्रेत्याने इन्स्टाग्रामवर क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीचे अकाउंट तयार करून देशभरात फसवणुकीचा उद्योग सुरू केला. कन्नडच्या व्यापाऱ्याच्या मुलाची यातच ७१ हजारांची फसवणूक झाल्यानंतर ग्रामीण सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तीन दिवस सुरतमध्ये ठाण मांडून अबुबकर मोहमंद शबीर नवाब (३८), सय्यद महंमद उनेस मियॉ हाफीज (३०) या दोघांना अटक केली.
ऑगस्ट महिन्यांत कन्नड येथील तरुणाने इन्स्टाग्रामवर क्रिप्टो ट्रेडिंगद्वारे अर्ध्या तासात पैसे दुप्पट करून देण्याच्या जाहिरातीवर विश्वास ठेवला. त्यात त्याची ७१ हजारांची फसवणूक झाली. त्यानंतर अशा अनेक तक्रारी येत असल्याने पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी विश्लेषण करून तपास करण्याच्या सूचना केल्या. प्राथमिक तांत्रिक तपासात गुजरातच्या सुरतवरून हे रॅकेट चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले. कलवानिया यांच्या आदेशावरून पथक सुरतला रवाना झाले. सय्यद महंमद पकडूनही अबुबकर मात्र मिळून येत नव्हता. पथकाने १८ ऑक्टोबर रोजी सुरतला गेले. तीन दिवस ठाण मांडल्यानंतर संशयित जनता मार्केटमध्ये असल्याचे कळाले. पोलिस असल्याचे ओळखताच अबुबकरने धूम ठोकली; परंतु तरीही पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय सहाणे, उपनिरीक्षक सतीश भोसले, अंमलदार कैलास कामठे, मुकेश वाघ, दगडू जाधव, दिलीप पवार, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी कारवाई केली.
अबुबकर हा जुने मोबाइल खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतो. इन्स्टाग्रामवर शिव ट्रेडर्स, ट्रेंड इन क्रिप्टो, रॉयल इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टो ऑन इंडिया, बिट कॉइन इन्व्हेस्टमेंट या नावाने पेज उघडले. लोकांना भुलवून पैसे गुंतवायला सांगून लाखो रुपये हडप करायचे. अनेक राज्यांचे पोलिस त्यांच्या शोधात होते.