लॉकडाऊनने दाखविले असेही प्रताप, चिमुकल्यांसाठी कुठे आनंद तर कुठे संताप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:04 AM2021-03-22T04:04:26+5:302021-03-22T04:04:26+5:30
मनमौजीपणाने खेळणे, बागडणे आणि सगळीकडे मुक्त संचार करणे हे बालपणाचे एक वैशिष्ट्य; पण कोरोनाने नेमके या गोष्टीवरच बंधन आणले. ...
मनमौजीपणाने खेळणे, बागडणे आणि सगळीकडे मुक्त संचार करणे हे बालपणाचे एक वैशिष्ट्य; पण कोरोनाने नेमके या गोष्टीवरच बंधन आणले. सुरुवातीला मजा म्हणून बालकांनी या गोष्टीकडे पाहिले; पण नंतर मात्र काहीजणांनी आपल्या पालकांच्या मदतीने या परिस्थितीशी जुळवून घेतले, तर काहीजणांना जुळवून न घेता आल्याने त्यांच्यातील 'डिस्ट्रक्टिव्ह बिहेविअर' म्हणजेच त्यांचे त्रासदायक वर्तन बाहेर येऊ लागले, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळ हा लहान बालकांसाठी निश्चितच त्यांची कसोटी पाहणारा ठरला आहे. शाळा बंद, खेळणे बंद यामुळे वेळ कसा घालवायचा, हा मुख्य प्रश्न बहुसंख्य मुलांना रोज छळतो आहे. अभ्यासात मन न लागणे, एकाग्रता नसणे, कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येणे, नवीन काही शिकण्याला विरोध करणे, लहानसहान गोष्टीत चिडणे, हट्टीपणा करणे, उलट उत्तरे देणे, कायम मोबाईल आणि टीव्ही पाहण्याचा हट्ट करणे, ही सगळी लक्षणे मुलांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, हे दर्शविणारी आहेत.
समवयस्कांसोबत वेळ न घालवता येणे आणि अधिकाधिक वेळ घरातील मोठ्या माणसांसोबतच असणे, अशी परिस्थिती बहुसंख्य बालकांची आहे. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी पालकांनीच मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालविणे, वय विसरून मुलांसोबत काही काळ त्यांच्यासारखेच होऊन खेळणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
चौकट :
चिमुकल्यांवर संमिश्र परिणाम
कोरोना काळातील एकटेपणामुळे अनेक बालकांचे त्रासदायक वर्तन वाढले आहे; पण मोबाईल, टीव्ही या वाढलेल्या स्क्रीनिंग टाईममुळे ते समोर येत नाही. काही बालकांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करून घेतला आणि स्व-अभ्यासाने त्यांच्या कला, छंद विकसित केले. याउलट काही बालकांची परिस्थिती अगदीच विरोधी आहे. वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. याशिवाय पालक वेळ देत नाहीत, ही बहुसंख्य मुलांची तक्रार आता लॉकडाऊनमुळे कमी झाली आहे. त्यामुळे बालकांच्या मानसिकतेवर कोरोनाचा संमिश्र परिणाम दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या माणसांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे, तसे चित्र लहान बालकांमध्ये दिसत नाही.
प्रा. डॉ. प्रसाद देशपांडे
मानसोपचारतज्ज्ञ