प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

By सुमित डोळे | Published: June 26, 2024 01:33 PM2024-06-26T13:33:38+5:302024-06-26T13:34:07+5:30

राजकीय हस्तक्षेपामुळे संदीप पाटील यांच्या पूर्णवेळ नियुक्तीला विरोध झाल्याची चर्चा

Praveen Pawar is the new Commissioner of Police of Chhatrapati Sambhajinagar | प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पोलिस आयुक्तपदासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी गृहमंत्रालयाकडून त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाले. पवार पुण्याचे सहआयुक्त होते.

दि. ३१ मे रोजी मनोज लोहिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे ‘डॅशिंग’ अधिकारी म्हणून परिचित असलेेल्या आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार शासनाने सोपवला होता. सध्या नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख असलेले पाटील यांना हा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मंगळवारी पाटील यांनी दिवसभर बैठका घेतल्या. येत्या दहा दिवसांमध्ये त्यांनी शहरातील वाढलेली गुन्हेगारी, बंद पोलिस चौक्यांसंदर्भात महत्त्वाचे नियोजन केले होते. दि. ५ जुलै रोजी उद्याेजकांसोबतही बैठक ठरवली होती. त्यामुळे पाटील पूर्णवेळ आयुक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात होती. मोठ्या राजकीय हस्तक्षेपामुळेच पाटील यांची पूर्णवेळ नियुक्ती होऊ शकली नसल्याची चर्चा पोलिस आयुक्तालयासह राजकीय गोटात सुरू होती.

पवार यांना जिल्ह्याचा दांडगा अनुभव
उपअधीक्षकापासून पोलिस सेवेस प्रारंभ केलेल्या पवार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाेलिस दलाच्या अपर अधीक्षक पदावर पूर्वी काम केले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात विविध ठिकाणी काम पाहिले. सध्या ते पुण्याचे सहआयुक्त होते. बुधवारी ते पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Praveen Pawar is the new Commissioner of Police of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.