औरंगाबादेत ईद-उल-अज्हाची नमाज अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:44 AM2018-08-23T00:44:45+5:302018-08-23T00:45:31+5:30
शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि अनेक मुख्य मशिदींमध्ये नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात ईद (ईद-उल-अज्हा) साजरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि अनेक मुख्य मशिदींमध्ये नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात ईद (ईद-उल-अज्हा) साजरी केली.
नमाजनंतर मुस्लिम बांधवांसह अन्य धर्मीयांनीसुद्धा गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छांचे आदान प्रदान केले. छावणीतील ईदगाह मैदानावर केरळमधील पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यात आला. भाविकांनी सढळ हाताने निधी दिला. छावणीतील ईदगाहमध्ये जामा मशिदीचे पेश इमाम हाफीज जाकीर साहब यांच्या नेतृत्वात मोठ्या जमावाने ईदची मुख्य नमाज अदा केली. तत्पूर्वी जामिया इस्लामिया काशीफ-उल-उलूमचे प्रमुख मौलाना मोईज, नसीम मुफ्ताही यांनीही मार्गदशर््ान केले. तर डॉ. जावेद मुकर्रम यांनी ईद-उल-अज्हाचे महत्त्व विशद केले.
छावणीतील ईदगाहसमोर सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, ज्ञानोबा मुंढे आणि हनुमंत भापकर तसेच नामदेव पवार, डॉ. पवन डोंगरे, जेम्स अंबिलढगे, मनोज निर्मळ, आहिरे, जॉन पारखे आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. छावणीतील कब्रस्तान समितीचे चेअरमन अब्दुल वहीद, सचिव हमीद खान, सहसचिव इक्बाल खान, सदस्य अश्फाक खान, आमेर खान इक्बाल खान, एम. ए. अजहर, रफिक अहेमद, शेख कासीम आदींनी ईदगाहची साफसफाई, रंगरंगोटी, नमाजसाठी उपस्थित भाविकांच्या बैठकीची व्यवस्था आणि महापालिकेने ‘वजू’ साठी पाण्याची व्यवस्था केली.