मान्सूनपूर्व तयारी : गोदाकाठच्या १,५७२ गावांसाठी यंत्रणा तयार ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:50 PM2020-05-27T19:50:20+5:302020-05-27T19:51:55+5:30
मराठवाड्यातील सर्व प्रमुख विभागांच्या प्रमुखांची विभागीय आयुक्तालयात झाली बैठक
औरंगाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात नदीकाठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठच्या १,५७२ गावांमध्ये प्राधान्याने विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी, असे आदेश मंगळवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हा प्रशासनास दिले.
ज्या गाव, वसाहतींमध्ये अतिपर्जन्यमानाची शक्यता आहे, गेल्या वर्षात ज्या-ज्याठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणांची गावे स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था, शाळा, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावी. त्याजागी पिण्याचे पाणी, जेवणाची योग्य व्यवस्था राहील, याची काळजी घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंना त्यांनी सूचना केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मान्सून पूर्वतयारी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. जि.प.ने सर्व पाझर तलाव, नद्या, काठावरची गावे या सर्वांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षणाचे उपाय करावेत. ज्याठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, त्याठिकाणी तातडीने ती दुरुती कामे पूर्ण करून घ्यावीत. धोकादायक तलाव, पाझर तलाव, धरणांवर २४ तास देखरेख ठेवावी. महावितरणने विद्युत खांब, विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा सुरक्षित आहेत का, पावसाच्या, वादळाच्या स्थितीत त्या धोकादायक बनणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. सा. बां. विभागाने सर्व पूल, रस्ते, इमारतींची पाहणी करावी, अस आदेश आयुक्तांनी दिले. मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ यांच्यासह पीडब्ल्यूडी, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, सिंचन, पाटबंधारे व इतर संबंधित यंत्रणांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
खाम नदीपात्राची पाहणी करा
खाम नदीपात्राची पाहणी करून आवश्यक असल्यास तेथील लोकांचे तात्पुरते सुरक्षित स्थलांतर प्राधान्याने करावे. पावसाच्या पाण्यात रस्ता, पूल वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे, बीड जिल्ह्यात बिंदुसरा व इतर खोल पात्र असणाऱ्या नद्यांची पाहणी करून अति पर्जन्यमानात उद्भवणाऱ्या संकटांच्या व्यवस्थापणाची पूर्वतयारी ठेवावी. लाईफ जॅकीट, बोटी व इतर आनुषंगिक उपाययोजना सज्ज ठेवावी, असे आदेश बैठकीत देण्यात आले.