चिमुकल्यांचे भावविश्व उलगडणाऱ्या ‘ई-आकार’ने जोडले ४४ हजार पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 07:07 PM2020-08-29T19:07:11+5:302020-08-29T19:10:15+5:30
लहान मुलांच्या आकलनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जात असल्याने पालकांचाही सहभाग वाढत आहे.
औरंगाबाद : लहान मुलांसाठी पहिले सहा वर्षे महत्त्वाचे. त्यातही ३ ते ६ वर्षांदरम्यान मुले पूर्वप्राथमिक शिक्षणात भोवतालची परिस्थिती संवेदनांचे धडे अंगणवाडीत गिरववात. मात्र, कोरोना, लॉकडाऊनमुळे अंगणवाडी भरत नाही. जिल्ह्यातील अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांसाठी ई-आकार प्रकल्प सुरू केला. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ४४ हजार पालकांना जोडले आहे. त्यापैकी २८ हजार पालक दररोजच्या खेळातून शिक्षणाच्या उपक्रमातील कृतीत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
जिल्ह्यात ३४५५ अंगणवाड्या आहेत. त्यासाठी ३३६० अंगणवाडी सेविका, ८० सुपरवायझर, १४ बालविकास प्रकल्प अधिकारी आणि दिल्लीतील रॉकेट लर्निंग या आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी अवतीभोवतीच्या वस्तूतून खेळ, संवेदना आणि मातांसोबत पुरुष पालकांचा बालकांच्या वाढीत हातभार लावण्यासाठी हा उपक्रम सुरू झाला. ई आकारसाठी एक अभ्यासक्रम रॉकेट लर्निंगच्या मदतीने ठरवून १० जूनला या उपक्रमाची सुरुवात झाली. त्याअगोदर सर्व अंगणवाडी सेविकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. दररोज मुलांना दोन कृती दिल्या जातात. त्यामध्ये विविध उपक्रमांतून मुलांना आकार, रंग, गंध, व्यवहारज्ञानाचे आकलन होईल. त्यात पालकांचा सहभाग असेल असा व्हिडिओ तयार करून मागवला जातो. असे २८ हजार पालक दररोज व्हिडिओ किंवा दिलेले टास्क पूर्ण करताहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, या विभागाच्या सभापती अनुराधा चव्हाण याकडे विशेष लक्ष देत असून अंगणवाडी सेविका मोबाईल नसतील अशा पालकांना त्यांच्या मोबाईलवरून टास्क पूर्ण करण्यासाठी मदत करत असल्याचे मिरकले यांनी सांगितले.
स्पर्धा, प्रोत्साहनामुळे २८ हजार पालकांचा प्रतिसाद
मंगळवारी या उपक्रमाचा ७६ वा दिवस होता. दररोज पालकांनी मुलांना किमान २० मिनिटे वेळ द्यावा. पाल्य व पालकांनी बनवलेले व्हिडिओ ग्रुपवर येतात. एकमेकांचे बघून सर्वच तसा प्रयत्न करतात. त्यातून निवडक उत्कृष्ट व्हिडिओंचा एक आकार टीव्ही नावाने व्हिडिओ बनवून पुन्हा पालकांकडे पाठवले जातात. लहान मुलांच्या आकलनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जात असल्याने पालकांचाही सहभाग वाढत आहे. शिवाय गरोदर माता, किशोरी, स्थनदा मातांपर्यंत संदेश पोहोचवण्याची सक्षम यंत्रणा यातून उभी राहिली असल्याचे मिरकले यांनी सांगितले.