अंतापूरकरांना धोक्याचा इशारा
By Admin | Published: June 10, 2014 12:06 AM2014-06-10T00:06:06+5:302014-06-10T00:16:04+5:30
श्रीधर दीक्षित, देगलूर निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश:
श्रीधर दीक्षित, देगलूर
निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश: मताधिक्याने तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांना मात देवून चमत्कार घडविला़ त्याची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अल्प मताधिक्याचा विचार करावा लागेल़ एकूणच काँग्रेस आमदार अंतापूरकरांना हा धोक्याचा इशारा आहे़
लोकसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेले तोकडे मताधिक्य या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर नेमकी काय भूमिका घेतील हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे़ देगलूर विधासभा मतदारसंघात काँग्रेस व सेना-भाजप या दोन प्रमुख पक्षामध्येच लढत होईल, हे सुस्पष्ट आहे़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किंवा आम आदमी पक्षाने येथे उमेदवार दिले तरी या पक्षांच्या संघटनेने अद्याप बाळसेही धरलेले नाही़ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी अन्य कुणाचे नाव समोर नाही आणि विद्यमान आमदारास उमेदवारी देण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यास अंतापूरकर हेच उमेदवार राहू शकतात़ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी लोकसभेच्या वेळी येथील प्रचार मोहीम राबविली़, परंतु आता उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी साबणे यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते़ शिवसेनेचे पदाधिकारी नागनाथ वाडेकर यांनी प्रथमच पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली असून जिल्हाप्रमुखांनी त्यासाठी शिफारस केली आहे़
मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीच्या मारोती वाडेकर यांनी बंडखोरी केली़ राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाडेकर यांचा उघड प्रचार केला़ मात्र अंतापूरकर व साबणे अशी सरळ लढत झाली व १६ हजार ८०० मते घेवून मारोती वाडेकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले़ लोकसभा निवडणुकीत वाडेकर हे चव्हाणांच्या बाजूने सक्रिय होते़ आ़ अमरनाथ राजूरकर यांच्याशीही जवळीक वाढविली़ आ़ अंतापूरकर यांच्याविरूद्ध देगलुरातील काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवकांनी अशोकराव चव्हाण यांच्यासमक्ष रोष व्यक्त केला होता़ त्यांना या मतदारसंघातून केवळ २३३७ एवढेच मताधिक्य मिळाले़ हे सर्व धागे एकत्रित करून आघाडीची उमेदवारी मिळवून नशीब आजमावण्याचा प्रयत्न मारोतीरावांनी चालविला आहे़ कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत माजी आ़ साबणे यांनी संपर्क मोहीम वाढविली आहे़ तर शिवसेनेकडूनच उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत भीमराव क्षीरसागरही उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. त्यामुळे लढतीत प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असतील, याची प्रतीक्षा आहे़