अत्याचारातून गर्भ; १३ वर्षीय मुलीच्या गर्भपातास खंडपीठाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 05:48 PM2019-07-16T17:48:54+5:302019-07-16T17:51:44+5:30
तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात दाखविण्यात आले.
औरंगाबाद : शौचास जात असताना अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तोंड दाबून केलेल्या अत्याचारातून १३ वर्षीय मुलीला गर्भ राहिला. पीडितेच्या वडिलांच्या संमतीपत्राआधारे खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे व न्या. आर. जी. अवचट यांनी सदर मुलीच्या २२ आठवड्यांच्या गर्भपाताची परवानगी दिली.
तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात दाखविण्यात आले. डॉक्टरांनी किरकोळ कारण असल्याचे सांगितले. काही दिवसांनी मुलीचे पोट जास्तच दुखायला लागले. पोटात दुखू लागल्याने औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी केली असता, मुलीच्या पोटात बावीस आठवड्यांचा गर्भ असल्याचे समजले.
डॉक्टरांनी वरीलप्रमाणे सांगितल्यावर मुलीचे आई-वडील सुन्न झाले. काय करावे हे त्यांना समजत नव्हते. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच आठवत नसल्याचे मुलीने सांगितले. खूप विचारणा केली असता एकेदिवशी रात्री शौचास जात असताना अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने मागून पकडले. तोंड दाबून बळजबरी अत्याचार केल्याचे सांगितले. अंधार असल्याने कोण होते हे समजलेच नाही, असे पीडित मुलीने सांगितले.
मुलीच्या आई-वडिलांनी वकिलाची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला. वकिलांनी प्रथम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गर्भपातासाठी परवानगी मिळावी यासाठी खंडपीठास याचिकेद्वारे विनंती करण्यात आली. शासकीय रुग्णालयातील जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचा अभिप्राय मागविण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर अल्पवयीन मुलीचा गर्भ पाडण्याचे आदेश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. राज देवढे, केंद्रातर्फे अॅड. डी. जी. नागोडे तर राज्य शासनाच्या अतिरिक्त सहायक सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी बाजू मांडली.