गर्भवती महिलेने घेतला गळफास, घातपाताच्या संशयाने माहेरच्या मंडळीचा सासरच्यांना चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:15 PM2022-05-30T12:15:10+5:302022-05-30T12:15:30+5:30
वर्षभरा पूर्वीचा झाला होता विवाह; रुग्णालयात दोन्ही कुटुंब आमने-सामने आल्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
वाळूज महानगर : तीन महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२८) सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. जयश्री रितेश पाटील (२५) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून, तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृत जयश्री हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात राडा करून तिच्या सासरच्या मंडळीस चोप दिला.
रितेश विकास पाटील (२८) हे बजाजनगरातील संजीवनी हाऊसिंग सोसायटीत पत्नी जयश्री, आई सुनीता पाटील, वडील विकास पाटील, मोठा भाऊ व वहिनी असे सर्वजण एकत्रित वास्तव्यास आहेत. वर्षभरापूर्वी २६ फेब्रुवारीला रितेश पाटील याचा जळगाव जिल्ह्यातील सोके, ता. पारोळा येथील जयश्री तुकाराम पाटील हिच्यासोबत विवाह झाला होता. या दोघांचा सुखाचा संसार सुरू असताना शनिवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास रितेशचे वडील मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. कुटुंबातील अन्य सदस्य घरातच झोपलेले होते. दरम्यान, सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सुनीता पाटील या मुलगा रितेश पाटील याच्या रुममध्ये गेल्या तेव्हा त्यांना सुन जयश्री दिसून आली नाही. सुन घरात दिसत नसल्याने त्यांनी रितेशला झोपेतून उठवून जयश्री घरात दिसत नसल्याचे सांगितले. त्यावेळी ती बाथरुमला किंवा दुसऱ्या रुममध्ये गेली असेल, असे रितेश म्हणाला. त्यानंतर जयश्री पाटील यांनी दुसऱ्या रुमचा दरवाजा उघडला असता त्यांना जयश्री ही सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पाटील कुटुंबीयांनी तिला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला ८ वाजताच्या सुमारास मृत घोषित केले.
जयश्रीच्या नातेवाईकांचा घाटीत राडा
जयश्री पाटील हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच माहेरीची मंडळी जळगाव येथून घाटीतील रुग्णालयात आले. यावेळी जयश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून तिच्या सासरच्या मंडळीसोबत वादावादी करण्यास सुरवात केली. दोन्ही कुटुंब आमने-सामने आल्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी घाटीतील सुरक्षारक्षक व पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही कुटुंबाची समजूत काढली. सायंकाळी बजाजनगर येथील स्मशानभूमीत जयश्री हिच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करीत आहेत.