'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 01:58 PM2022-06-04T13:58:38+5:302022-06-04T13:59:32+5:30
या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या पदवी परीक्षेत समन्वय नसल्याने नियोजनाचा फज्जा उडाला. यामुळे गुरुवारी आसनव्यवस्थेवरून मोठा गोंधळ झाला. याप्रकरणी परीक्षा विभाग व परीक्षा केंद्राने घडलेल्या घटनेचा प्राथमिक अहवालात काय घडले, याची माहिती आहे. हा अहवाल राज्य शासनाला पाठवू. या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विजेयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एका बेंचवर तीन विद्यार्थी बसवले. मात्र, ते वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे होते. प्रिंटिंगला झालेला उशीर कुणामुळे झाला. अधिकचे विद्यार्थी त्या महाविद्यालयावर कसे पाठवले गेले. तिथे प्रवेशित विद्यार्थी व बैठक क्षमता किती आहे. काही वर्गखोल्या रिकाम्या होत्या, तर त्या का वापरात आणल्या नाहीत. यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परीक्षा संचालकांची सुनावणी घेतली जाईल. त्यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून दोन दिवसांत अहवाल आल्यावर आढळलेल्या दोषींवर कारवाई होईल.
विद्यापीठाने समोर येऊन ऑफलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. ३ लाख परीक्षार्थी असून २२५ पैकी एकाच केंद्रावर ही घटना घडली. उर्वरित सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत झाली आहे. कोणताही परीक्षार्थी केंद्रावर आल्यावर तो परीक्षेपासून वंचित राहू नये, असे विद्यापीठाचे धोरण आहे. उत्तरपत्रिका वेगळ्या सील करा. मात्र, तांत्रिक कारणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. काॅपीमुक्तीसाठी घेतलेल्या निर्णयात होम सेंटर ठेवले नाही. त्यामुळे काही अडचणी आल्या. मात्र, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत. त्यासाठी विद्यापीठ काळजी घेईल, असेही कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.