अवकाळीने नुकसान केले, मेंढ्यांना कुरण झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:04 AM2021-02-26T04:04:32+5:302021-02-26T04:04:32+5:30
सोयगाव परिसरातील कंकराळा, जरंडी, निंबायती, माळेगाव आणि पिंपरी आदी भागात गुरुवारी आणि शुक्रवारी गारांसह अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये रब्बीचा ...
सोयगाव परिसरातील कंकराळा, जरंडी, निंबायती, माळेगाव आणि पिंपरी आदी भागात गुरुवारी आणि शुक्रवारी गारांसह अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये रब्बीचा मका, गहू, कांदा, सूर्यफूल व भाजीपाल्याच्या क्षेत्राचे पन्नास टक्के नुकसान झाले होते. परंतु महसूल आणि कृषी पथकाने मात्र पंचनामे तर सोडा, साधी पाहणीदेखील केली नाही. त्यामुळे आठवडा उलटूनही प्रशासन पंचनामे करत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्याच्या क्षेत्रात मेंढ्यांचे कळप घातले.
कृषी विभाग म्हणतेय नुकसानच झाले नाही
सोयगाव तालुक्यातील तीन गावात अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसानीची महसूल प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली गेली. त्यांनी तालुका कृषी विभागाला बाधित क्षेत्राची आकडेवारी गोळा करण्याचे आदेश दिले. मात्र, तालुका कृषी विभागाकडून नुकसान झाले नसल्याची माहिती महसूल विभागाला दिल्याचे समोर आले आहे. महसूल व कृषी विभागाच्या गोंधळात बाधित शेतकरी भरडला जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे अवकाळीच्या उघडीपनंतर कृषी विभागाचा एकही कर्मचारी नुकसानग्रस्त भागात फिरकलेला नाही. त्यामुळे तालुका कृषी विभागाकडून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांनी कोणत्या आधारावर नुकसान झालेच नाही, असे महसूल विभागाला कळविले, हे कळत नाही.
-------------
जरंडी, कंकराळा, निंबायती परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. कृषी विभागाकडे नुकसानीचा अहवाल विनाविलंब सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.
- प्रवीण पांडे, तहसीलदार.
सोयगाव छायाचित्र ओळ : सोयगाव परिसरात अवकाळीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांमध्ये मेंढ्या चरत आहेत.