अवकाळी, गारपिटीच्या पंचनाम्यांना कोरोनाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:05 AM2021-04-19T04:05:11+5:302021-04-19T04:05:11+5:30
सोयगाव : तालुक्यात झालेल्या मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीवर आलेल्या रबी पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची महसूल ...
सोयगाव : तालुक्यात झालेल्या मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीवर आलेल्या रबी पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने पाहणी केली. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला. मात्र, सध्या जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या कामात गुंतल्याने या भरपाईच्या फायलींना कोरोनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदतीची अपेक्षा धूसर होऊ लागली आहे.
तालुक्यात काही भागांत अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसून गारपीट झाली होती. रबीचा हंगाम ऐन काढणीच्या कालावधीत या वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातल्याने रबीची पिके आडवी झाली होती. त्यानंतर कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाने या नुकसानीच्या पंचनाम्यांना संबंधित विभागांनी केराची टोपली दाखविली गेली. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान पाहता तहसील व कृषी विभागाने पाहणी केली. प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र, जिल्हा प्रशासन सध्या कोविड कामात व्यस्त असल्याने रबीच्या गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या नुकसानीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही.