लोकसभा निवडणुकीची तयारी; उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या जनसंवाद दौऱ्यावर
By बापू सोळुंके | Published: February 10, 2024 07:19 PM2024-02-10T19:19:50+5:302024-02-10T19:29:00+5:30
छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेसाठी एकत्रित संवाद सभा देखील होणार
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक तयारीच्या निमित्ताने जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी गंगापूर - खुलताबाद , वैजापूर, कन्नड- सोयगाव , छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार शिंदे गटात आहेत. मात्र, मतदार निष्ठावंत असून ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा दावा नेते करत आहेत. यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे जनसंवाद दौऱ्यातून मतदारापर्यंत जात आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असेल.
पाच आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसैनिकांवर भिस्त
जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार शिंदे गट शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे यांच्या पक्षाची सर्व भिस्त शिवसैनिकांवर आहे.आमदार सोडून गेले असले तरी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्यासोबत असल्याचा दावा सतत पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो. पक्षाकडून लोकसभा उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. पक्षाकडून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे इच्छुक आहे. असे असले तरी मातोश्रीने खैरे यांनाच आशीर्वाद देण्याचे संकेत दिल्याने खैरे कामाला लागल्याची चर्चा आहे.
असा असेल दौरा:
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोमवारी, १२ रोजी सकाळी १० वाजता विमानाने संभाजीनगर शहरात आगमन होईल. दुपारी १२ वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी २ वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधतील. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत. रात्री ७:३० वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत.