नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता
By संतोष हिरेमठ | Published: September 18, 2024 07:46 PM2024-09-18T19:46:57+5:302024-09-18T19:47:32+5:30
याच वर्षी प्रवेशप्रक्रियेसाठी तयारी, त्रुटी निघाली नाही तर यावर्षी कमी शुल्कात घडतील आणखी ८०० भावी डाॅक्टर
छत्रपती संभाजीनगर : राज्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या ८ नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रियेसाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी १५ दिवसांत कोणत्याही त्रुटी निघाल्या नाही तर प्रवेशप्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल आणि कमी शुल्कात ८०० भावी डाॅक्टर घडतील. प्रवेशप्रक्रियेत अडचण आली तर विद्यार्थ्यांना लाखो रुपये मोजून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा रस्ता धरावा लागेल.
नव्या ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी उसनवारी तत्त्वावर राज्यभरातील जवळपास ६२ सहयोगी, सहायक आणि प्राध्यापकांची सेवा वर्ग करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील ९ डाॅक्टरांचा समावेश आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिक्षकांचा यात समावेश आहे. या ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तिसऱ्या राउंडपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरूू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील एकूण शासकीय वैद्यकीय महाविद्यालये- ३३
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण जागा- ५०५०
एकूण खासगी वैद्यकीय महाविद्यालये- २२
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण जागा- ३१७०
शुल्काची स्थिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- सुमारे १.५२ लाख रु.
खासगी वैद्यकीय महाविद्यालय- ५ लाख ते १५ लाख रु.
ही आहेत नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये
शहर -जागा
जालना- १००
भंडारा- १००
हिंगोली- १००
बुलढाणा- १००
गडचिरोली- १००
अमरावती- १००
अंबरनाथ- १००
वाशिम- १००
...तर यावर्षीच प्रवेशप्रक्रिया
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. अंबड रस्त्यावरील गणेशनगर येथील २६ एकर जागेवर इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. लवकरच बांधकाम सुरू होईल. जिल्हा रुग्णालयासोबत सामंजस्य करार झाला असून, ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना येथे चिकित्सालयीन प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होण्यासाठी इमारत भाड्याने घेण्यात आलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षात मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाकडे द्वितीय अपील असून, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी अपेक्षित आहे. मान्यता मिळाल्यास चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, अशी आशा आहे.
- डाॅ. सुधीर चौधरी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना