औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय इज्तेमाची तयारी जोरात; ८८ लाख वर्ग फूट जमिनीवर उभारणार भव्य पेंडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 07:38 PM2018-02-13T19:38:05+5:302018-02-13T22:48:03+5:30

शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे २४ फेब्रुवारीपासून तीनदिवसीय राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाची तयारी जोरात सुरू आहे. या धार्मिक मेळाव्यासाठी १० लाखांहून अधिक भाविक येणार आहेत.

preparation going on for state level ijatema at aurangabad | औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय इज्तेमाची तयारी जोरात; ८८ लाख वर्ग फूट जमिनीवर उभारणार भव्य पेंडॉल

औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय इज्तेमाची तयारी जोरात; ८८ लाख वर्ग फूट जमिनीवर उभारणार भव्य पेंडॉल

googlenewsNext
ठळक मुद्देधुळे शहरात २० वर्षांपूर्वी राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ऐतिहासिक औरंगाबाद शहराला इज्तेमाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे.इज्तेमासाठी येणार्‍या लाखो भाविकांना मुबलक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून राज्यभरातून आलेले हजारो मुस्लिम बांधव रात्रं-दिवस श्रमदान करीत आहेत.

औरंगाबाद : शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे २४ फेब्रुवारीपासून तीनदिवसीय राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाची तयारी जोरात सुरू आहे. या धार्मिक मेळाव्यासाठी १० लाखांहून अधिक भाविक येणार आहेत. देशाच्या विविध कान्याकोपर्‍यासह देश-विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. इज्तेमासाठी येणार्‍या लाखो भाविकांना मुबलक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून राज्यभरातून आलेले हजारो मुस्लिम बांधव रात्रं-दिवस श्रमदान करीत आहेत.

धुळे शहरात २० वर्षांपूर्वी राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ऐतिहासिक औरंगाबाद शहराला इज्तेमाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. मागील सहा महिन्यांपासून इज्तेमाची जय्यत तयारी सुरू असून, दररोज दहा हजारांहून अधिक मुस्लिम बांधव इज्तेमास्थळी विविध कामे करीत आहेत. इज्तेमामध्ये दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजचे प्रमुख उलेमा यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या इज्तेमात अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पै.(सल्ल) यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमा मार्गदर्शन करणार आहेत.  
इज्तेमासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकही उपस्थित राहतील. देश-विदेशातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत. इज्तेमाला येणार्‍या भाविक व जमातच्या साथीदारांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लिंबेजळगाव येथे शेकडो एकर जमिनीवर काम सुरू आहे. इज्तेमा स्थळी भाविकांना नमाज अदा करण्यासाठी तसेच बसण्यासाठी सभामंडप उभारणे, हात-पाय धुण्यासाठी वजुहखाने उभारणे, भाविकांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इज्तेमाच्या परिसरात २२ पेक्षा अधिक छोटे-छोटे शेततळे उभारून पाण्याचा साठा करण्यात येत आहे.

इज्तेमासाठी तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृह उभारणे, लाईट, ध्वनियंत्रणा इत्यादी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. संयोजकांनी प्रत्येक कामासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या मुस्लिम बांधवांवर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली आहे. प्रत्येक जण दिलेली जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडत आहे. औरंगाबाद व आसपासच्या जिल्ह्यांतील मुस्लिम महिलाही इज्तेमासाठी स्वच्छता व साफसफाईचे काम करण्यासाठी हातभार लावत आहेत. 

हिंदू बांधवांनी दिल्या जमिनी
मागील वर्षी लिंबेजळगाव येथे जिल्हास्तरीय इज्तेमाचे आयोजन केले होते. यासाठी लिंबेजळगाव येथील हिंदू बांधवांनी आपल्या जमिनी नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या होत्या. यंदाही परिसरातील असंख्य हिंदू बांधवांनी आपल्या शेतातील पिके काढून तीन महिन्यांपूर्वीच जमिनी संयोजकांच्या ताब्यात दिल्या. लिंबेजळगाव, टेंभापुरी व लगतच्या गावांतील हिंदू बांधवांनी आपल्या शेतातील विहिरींचे पाणीही मोफत उपलब्ध करून दिले. 

भरगच्च धार्मिक कार्यक्रम
या इज्तेमात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. इज्तेमात मुस्लिम समुदायातील तरुण-तरुणींचे सामूहिक विवाह लावण्यात येणार आहेत. २६ फेबु्रवारीला सकाळी ९.३० वाजता प्रमुख उलेमा समाजबांधवांना मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर सामूहिक दुआ होऊन या इज्तेमाची सांगता केली जाणार आहे.

२५ हजार नळ, ५ हजार स्वच्छतागृह
भाविकांना हात-पाय धुण्यासाठी जवळपास २५ हजार नळांची, तसेच ५ हजार स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. आंघोळीसाठी जवळपास १५०० प्रसाधनगृह, जेवणासाठी २ हजार ५०० हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. इज्तेमासाठी १०२ झोन उभारण्यात आले आहेत. या परिसरात विजेची व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून उच्च क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मर तसेच मोठमोठे जनरेटर बसविण्यात आले आहेत. मैदानाच्या चारही बाजूंनी अद्ययावत ध्वनियंत्रणा बसविण्यात आलेली आहे. इज्तेमात कुणी आजारी पडल्यास त्यांच्यासाठी रुग्णालय, तज्ज्ञ डॉक्टर्स, रुग्णवाहिका व औषधींची व्यवस्था आहे.

डोळ्यांचे पारणे फेरणारे सभामंडप
जवळपास ८८ लाख चौरस फुटांचा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय छोटे-छोटे शामियाने उभारण्यात आले आहेत. मुख्य सभामंडपात एकाच वेळी जवळपास ७ ते ८ लाख मुस्लिम बांधव बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

अद्वितीय अशी पार्किंग व्यवस्था
इज्तेमात येणार्‍या मुस्लिम बांधवांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी चोहोबाजूंनी जवळपास १४०० एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगची व्यवस्था सांभाळण्यासाठी किमान ५ हजार स्वयंसेवक राहणार आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला आठ तास उभे राहावे लागेल. त्याने ८ तास आराम करावा, नंतर आठ तास इज्तेमाला हजेरी लावावी, असे नियोजन आहे. शहरातील ‘अल्तमश ग्रुप’ने औरंगाबादच्या पार्किंगची जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: preparation going on for state level ijatema at aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.