वाई गोरखनाथ येथे महापोळ्याची तयारी
By Admin | Published: August 24, 2014 11:35 PM2014-08-24T23:35:40+5:302014-08-24T23:53:54+5:30
अंबादास फेदराम, आंबाचोंढी श्रीक्षेत्र वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या करीला महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बैल पोळ्याचे आयोजन करण्यात येते.
अंबादास फेदराम, आंबाचोंढी
श्रीक्षेत्र वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या करीला महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बैल पोळ्याचे आयोजन करण्यात येते. परिसरातील सर्वच गावातून ज्येष्ठ ग्रामस्थांनी नेमलेल्या पंचकमेटीमार्फत यंदाच्या संपुर्ण यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे वाई गोरखनाथ येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. यात्रेकरू व बैलांना पाणी पाजण्यासाठी मोठी अडचण होणार आहे. यावर्षी हिंगोली जिल्हा परिषदेने विशेष बाब म्हणून कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे टँकर व चाऱ्याचा पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली होती. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिलेले दिसत नाही.
सदरील तीर्थक्षेत्राला ब गटात समाविष्ट करावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच पशुवैद्यकीय खाते म्हणावे तशी सेवा देत नाही. जिल्ह्याच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने याकडे लक्ष देवून आपली एक दिवशीय विशेष पथक तयार करून येणाऱ्या साठ ते सत्तर हजार बैलजोड्यांची सेवा होईल, अशी उत्कष्ट पशुवैद्यकीय डॉक्टरांची फळीच येथे तयार ठेवावी. येथे पौष पौर्णिमेला यात्रा महोत्सव, तसेच रामभाऊ महाराज पुण्यतिथी, श्रावण प्रतिपदेला नवनाथ ग्रंथवाचन, भाद्रपद प्रतिपदेला बैलांची भव्य यात्रा कार्तिकी त्रयदशीला गोरखनाथ महाराज प्रगटदीन साजरा होतो. संपुर्ण मराठवाड्यातून यात्रेनिमित्त तमाशामंडळे, झुलेवाले, मिठाई, कटलरी, भांड्याचे व्यापारी मोठ्या प्रमाणात येवून यात्रेची शोभा वाढवतात. यंदाही पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच नागेशवाडीवरून हट्ट्यामार्गे व वसमतहून ते झिरोफाटामार्गे वाहतुक वळवून वसमत टी पाँईट ते नागेशवाडी वाहनमुक्त परिसर ठेवून बैलांना येण्या-जाण्यासाठी राज्यरस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे.