छत्रपती संभाजीनगरात ११ व्या उड्डाणपुलाची तयारी; बायपासला जाण्यासाठी आणखी एक पर्याय
By मुजीब देवणीकर | Published: July 27, 2023 08:13 PM2023-07-27T20:13:44+5:302023-07-27T20:14:42+5:30
ई-कॅमव्हेंचर या प्रकल्प व्यवस्थापन समितीला आराखडा तयार करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे उड्डाणपुलांचीही भर पडू लागली.आतापर्यंत १० उड्डाणपूल उभारण्यात आले. ११ व्या उड्डाणपुलासाठी मनपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरात एक उड्डाणपूल उभारल्यास देवगिरी महाविद्यालयासमोरील वाहतूक थेट बीड बायपासला येईल. नाशिक येथील ई-कॅमव्हेंचर या प्रकल्प व्यवस्थापन समितीला दहा दिवसांत प्रकल्प आराखडा तयार करून देण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.
पद्मपुरा भागातील नागरिकांना बीड बायपासला जायचे असेल तर एकनाथनगर किंवा रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावरून जावे लागते. त्यामुळे तत्कालिन प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी रेल्वे स्टेशन एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. या उड्डाण पुलासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात तब्बल १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासक म्हणून जी. श्रीकांत यांनी पदभार घेतला. त्यांनीही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे स्टेशन एमआयडीसी भागात उड्डाणपूल उभारण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर अभियंता विभागाने पीएमसी नियुक्तीसाठी निविदा काढली.
नाशिक येथील ई-कॅमव्हेंचर यांची निविदा अंतिम करून या पीएमसीला उड्डाणपूल उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून सादर करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात अधिक माहिती देताना शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी सांगितले की, एमआयडीसी परिसरात उड्डाणपूल उभारण्यासाठी नैसर्गिकरित्या डोंगर आहे. देवगिरी महाविद्यालयासमोरून एमआयडीसीकडे जाणारा रस्तादेखील तयार करण्यात आलेला आहे. या डोंगराच्या मध्यभागी रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे ट्रॅकवर उड्डाणपूल बांधला तर वाहतुकीची मोठी समस्या दूर होईल.