कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी; गरवारे स्टेडियम येथील बाल कोविड रुग्णालय पुढील महिन्यात सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:24 PM2021-05-17T19:24:53+5:302021-05-17T19:25:08+5:30
मनपा प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद : तिसर्या लाटेत कोरोनाची बालकांना लागण होण्याची शक्यता गृहित धरून महापालिकेने गरवारे स्टेडियम परिसरात बाल कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाच्या उभारणीचे काम सध्या सुरू असून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णालय पूर्णपणे तयार होईल, असा विश्वास मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी व्यक्त केला.
मनपा प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी चिकलठाणा येथील गरवारे कंपनीच्या शेडची पाहणी करून कंपनीकडूनच ऑक्सिजनसह शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारून देण्याची विनंती केली. कंपनीने कोविड सेंटर उभारून देण्याची तयारी दर्शवली. शून्य ते बारा वर्षे वयोगटातील बालकांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यास त्या बालकांना पालकांसह या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात डॉ. पाडळकर यांनी नमूद केले की, दुसऱ्या लाटेतही बालकांना संसर्गाची लागण होत आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन गरवारे परिसरात शंभर खाटांचे बाल कोविड रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तेथे बालकांसाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा असणार आहेत.
डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
बालकांवर उपचार करण्यासाठी मनपाच्या बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांना, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी १५ दिवस घाटी रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांची बाल कोविड सेंटरमध्ये नियुक्ती केली जाईल. एमजीएम येथील बाल रुग्णालय थोडे उशिराने सुरू करण्यात येणार आहे.