संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता रजिस्टर पोस्टाने दुसरी नोटीस बजाविण्याची तयारी

By विजय सरवदे | Published: January 19, 2024 01:59 PM2024-01-19T13:59:29+5:302024-01-19T14:03:10+5:30

आयुक्तालयाने ‘नो वर्क, नो पे’ हा पवित्रा घेतल्यामुळे दीड महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधनापासून वंचित आहेत.

Preparation to issue second notice to striking Anganwadi workers now by registered post | संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता रजिस्टर पोस्टाने दुसरी नोटीस बजाविण्याची तयारी

संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता रजिस्टर पोस्टाने दुसरी नोटीस बजाविण्याची तयारी

छत्रपती संभाजीनगर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तब्बल दीड महिन्यापासून बालके, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार वाटप झालेला नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती; पण तीही यशस्वी होऊ शकली नाही. लसीकरण व कुपोषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दरम्यान, कामावर रुजू होण्यासंबंधीची दुसरी नोटीस आता संबंधितांच्या मोबाइलवर, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तसेच रजिस्टर पोस्टाने बजाविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. 

जि. प. महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी संपात सहभागी असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पूर्ववत सेवा सुरू करण्यासाठी विनंती करणारी ‘क्लीप’ व्हायरल केली. दुसरीकडे, एकात्मिक बालविकास आयुक्तालयांच्या निर्देशानुसार कारणे दाखवा नोटिसाही बजाविण्यात आल्या. आयुक्तालयाने ‘नो वर्क, नो पे’ हा पवित्रा घेतल्यामुळे दीड महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधनापासून वंचित आहेत. परिणामी, आता संपात सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी गुरुवारी सकाळपर्यंत सुमारे १ हजार ९६ जणी कामावर रुजू झाल्या, तर ४ हजार ७४२ सेविका, मदतनीस अजूनही संपातच आहेत.

संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे अंगणवाड्यांचे कामकाज संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. संपामुळे अंगणवाड्यांतील शून्य ते ६ वर्षे वयोगटातील सुमारे २ लाख २५ हजार बालकांचा तसेच गरोदर माता, स्तनदा मातांचा पोषण आहार, लसीकरण ठप्प झाले आहे. कुपोषणाच्या ‘सॅम’ व ‘मॅम’ श्रेणीतील जवळपास साडेपाच हजार बालकांच्या आरोग्याचे मॉनिटरिंग, बालकांचे नियमित वजन व उंचीचे अवलोकन थांबले आहे.

सोमवारपासून बजावणार नोटिसा
आता संपातून माघार घेतलेल्या अंगणवाडी कर्मचारी तसेच पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून पोषण आहार वाटप करणे आणि संपातील कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्यासंबंधीची दुसरी कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश गुरुवारी सायंकाळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सचिवांकडून मिळाल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून या नोटिसा बजाविल्या जाणार आहेत.

अशी आहे स्थिती: 
जिल्ह्यात २ हजार ४६९ मोठ्या अंगणवाड्या, ७७५ मिनी अंगणवाड्या
- संपात सहभाग : १ हजार ९८४ अंगणवाडी सेविका, ६३२ मिनी अंगणवाडी सेविका, २ हजार १२६ मदतनीस
- संपातून माघार: ४८५ अंगणवाडी सेविका, १४३ मिनी अंगणवाडी सेविका, ४६८ मदतनीस

Web Title: Preparation to issue second notice to striking Anganwadi workers now by registered post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.