गोरगरिबांची भाकर वाचविण्यासाठी आणखी मोठ्या लढाईची तयारी सुरु: राकेश टिकैत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:23 PM2022-04-12T12:23:11+5:302022-04-12T12:24:29+5:30

शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारू.

Preparations begin for another big battle to save bread for the poor: Rakesh Tikait | गोरगरिबांची भाकर वाचविण्यासाठी आणखी मोठ्या लढाईची तयारी सुरु: राकेश टिकैत

गोरगरिबांची भाकर वाचविण्यासाठी आणखी मोठ्या लढाईची तयारी सुरु: राकेश टिकैत

googlenewsNext

औरंगाबाद : देशात मोठमोठे गोदाम तयार केले जात आहेत. त्यात अन्नाचा मोठा साठा करून तो विकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे भाकर विकली जाईल. भाकर ही उदरनिर्वाहाची गोष्ट आहे, विकण्याची नव्हे आणि आमचा प्रयत्न ही भाकर वाचवण्याचा आहे, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी (दि. ११) औरंगाबादेत केले.

एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतातील शेतकरी आणि सरकारची धोरणे’ यावर ते बोलत होते. प्रा. अंजली आंबेडकर अध्यक्षस्थानी होत्या. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

टिकैत म्हणाले, सरकार लोकांना तोडण्याचे काम करत आहे. तर, आम्हाला लोकांना जोडून ठेवायचे आहे. देशातील ५० कोटी म्हणजे ४० टक्के शेतकऱ्यांना शेतीपासून दूर नेण्याचा डाव आहे. हमीभावाचा कायदा आणायचा असून त्या कायद्यासाठी मोठ्या लढाईची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारू. त्या नव्या संघर्षासाठी तयार व्हा. त्यात तरुणाईचा सहभाग आवश्यक आहे. तो लढा शेवटपर्यंत लढू. तासाभराच्या व्याख्यानात टिकैत यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

शाहीर वसुधा कल्याणकर यांनी पोवाडा सादर केला. प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी प्रास्ताविक केले. शेखर मगर यांनी सूत्रसंचालन तर तृप्ती डिग्गीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुकुल निकाळजे यांनी आभार मानले.

सरकारची सूडभावनेने कारवाई
विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. आदोलनात सहभागी लोकांवर सूडभावनेने केंद्र शासन धाडी टाकत आहे. विद्यार्थी, पालक, युवक आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. मात्र, विद्यापीठांत कार्यक्रम घेण्यास लोक पुढे येत नाहीत. त्यांना भीती असताना एमजीएमने पहिला कार्यक्रम घेतला. त्यामुळे आपणही कारवाईसाठी तयार राहा अशी मिश्कील कोपरखळी टिकैत यांनी मारली. मात्र, कदम यांनी आम्ही घाबरत नसल्याचे स्पष्ट केले.

वंचित, शोषितांना संरक्षण मिळावे-अंजली आंबेडकर
अध्यक्षीय समारोपात अंजली आंबेडकर म्हणाल्या, कुणीच झुकवू शकत नाही, अशी प्रतिमा तयार केलेल्या सरकारला एकजूट झालेल्या शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. जेव्हा सर्वसामान्य पेटून उठतो त्याच्यासमोर कुणालाही झुकावे लागते. शेतकऱ्यांसमोर सरकारलाही असेच झुकावे लागले. या आंदोलनाने देशातील निराशेची मरगळ दूर केली. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी सरंक्षणाची होती आणि तीच समाजातील वंचित, शोषित घटकांची आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची भूमिका सर्वसामान्यांच्या कल्याणाची होती. त्या कल्याणाच्या भूमिकेवर आपणही कायम राहावे.

Web Title: Preparations begin for another big battle to save bread for the poor: Rakesh Tikait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.