मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिल्लोडमध्ये जंगी तयारी; खोतकर, नवले येणार शिंदे गटात ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:08 PM2022-07-29T20:08:11+5:302022-07-29T20:08:30+5:30
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सिल्लोड (औरंगाबाद) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड येथील नागरी सत्काराची आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्यावतीने जैय्यत तयारी करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात माजी मंत्री अर्जुन खोतकर व प्रा.सुरेश नवले यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण निमित्ताने सिल्लोड येथे येत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड शहरांतील प्रत्येक चौकात स्वागताचे बॅनर, होर्डिंग, कमानी, भगव्या पताका लावण्यात आल्या आहे.
नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात होणार सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 12 वाजता सिल्लोड शहरात आगमन होणार आहे. शहरातील औरंगाबाद नाका ते सभास्थळापर्यंत मुख्यमंत्र्यांचे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यादरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे लोकार्पण, शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे चौकाचे लोकार्पण, तालुक्यातील ६६५ कोटी रुपयांच्या वॉटरग्रीड योजनेचे भूमिपूजन, नॅशनल सुतगीरणी उभारणी कामाचे भूमिपूजन,सिल्लोड नगर परिषद प्रशासकीय इमारत तसेच नगर परिषद प्रशाला बांधकामांचे भूमिपूजन , नॅशनल मेडिकल कॉलेज चे भूमिपूजन आदी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर नगर परिषद प्रशाला येथे आयोजित भव्य सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील.
--------